आकडेवारीचा खेळ : प्रत्येक अंदाजपत्रकात फुगविले जातात आकडे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन विभागाच्या माध्यमातून मिळकत कर वसूल करण्यात येतो. दरवर्षी महापालिका मिळकत कर वसूल करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत असते. मात्र, गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहता अंदाजपत्रकात निश्चित केलेल्या लक्ष्याच्या तुलनेत कमी मिळकत कर वसूल होत आहे. तरीदेखील पुढील वर्षी मिळकत कराचे लक्ष्य वाढविले जात आहे. त्यामुळे महापालिकेला हक्काचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या मिळकत कराच्या आकडेवारीच्या खेळात प्रशासनाची फसगत होताना दिसत आहे.
औद्योगिकनगरी, कामगारनगरी, स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण झालेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील नागरीकरण वाढत आहे. पर्यायाने शहरातील चारही बाजूने टोलेजंग इमारती उभ्या राहत असल्याने मिळकतींची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे दरवर्षी महापालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होत असतानाच नागरी सुविधांवरही काही प्रमाणात ताण येत आहे. शहरात सव्वा पाच लाख 68 हजार नोंदणीकृत मिळकती आहेत.
शहरातील महापालिकेच्या कर संकलन झोनमधील 16 कार्यालयात रोख, धनादेश आणि ऑनलाइन पध्दतीने दरवर्षी मिळकत कर जमा होत असतो. प्रत्येक वर्षीच्या अंदाजपत्रकात कर संकलन विभागाला उत्पन्नाचे टार्गेट दिले जाते. मात्र, हे टार्गेट पूर्ण होत नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
2019-20 मध्ये सुमारे 402 कोटी रुपये कर जमा झालेला असताना 2020-21 साठी 750 कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आणि पालिकेच्या तिजोरीत 448 कोटी रुपये जमा झाले. तरी पुढील वर्षी 950 कोटींचे लक्ष्य ठेऊन पुन्हा ते बदलत 850 कोटी निश्चित
करण्यात आले.
याउलट बाधंकाम परवाना विभागाचे उत्पन्न मिळकत कराच्या उत्पन्नापेक्षाही अधिक होताना दिसून येत आहे. याचाच अर्थ की शहरात मोठ्या प्रमाणात नव्याने बांधकाम होत आहे. नव्याने बांधकाम झाल्यानंतर मिळकत करातून उत्पन्नही वाढणे अपेक्षित आहे.
बुधवारअखेर महापालिका तिजोरीत 570 कोटी
महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत बुधवारअखेर 570 कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. आज (गुरूवार) आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस बाकी असून शेवटच्या दिवशी जास्तीत-जास्त कर वसूल करण्यास प्राधान्य असणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.
महापालिकेच्या करसंकलन विभागाला 2021-22 या आर्थिक वर्षांत 850 कोटींचा महसूल गोळा करण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. बुधवारअखेर 570 कोटी रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. मोठ्या प्रमाणात कर थकविणाऱ्या शहरातील विविध भागातील 106 मालमत्ता सील केल्या आहेत. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. शेवटच्या दिवशी 30 ते 35 कोटी कर तिजोरीत जमा होईल, असा विश्वास सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी व्यक्त केला आहे.