पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी) -महापालिकेने करदात्यांनी मिळकतकर थकविला असेल तर त्यांच्या घरातील कार, फ्रीज, टीव्ही जप्त कऱण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत चुकिचा असून त्यामुळे शहराची प्रतिमा मलिन होऊ शकते. तसेच थकबाकीदारांची समाजात आणि त्याच्या कुटुंबात नाचक्की करून वसुली करणे ही आपली संस्कृती नाही, म्हणून तो त्वरीत मागे घेण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
निवेदनात सावळे यांनी म्हटले आहे की, दोन-अडीच वर्षांत करोनामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बंद पडले. अनेकांना बॅंकांचे हप्ते थकल्याने सर्वस्व गमवावे लागले. अनेक घरांतून कमावणारे दिवगंत झाले. लाखो लोक देशोधडिला लागल्याचे चित्र आहे. गोरगरिबांच्या बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने समाजात प्रचंड असंतोष खदखदतो आहे. या सर्व परिस्थितीवर मात करून शहरातील उद्योग व्यवसाय चालक आता कुठे उभारी घेत आहेत. अशात मिळकत वसुलीसाठी लोकांच्या घरातील कार, फ्रीज, टीव्ही अशा घरगुती वस्तू जप्त कऱण्याचा आदेश हा अत्यंत चुकिचा वाटतो. सामान्य जनतेचा अशा प्रकारे अपमान करणे योग्य होणार नाही.
महापालिकेचा 100 टक्के मिळकतकर वसूल झाला पाहिजे याबाबत दुमत नाही. जे करदाते सराईत थकबाकीदार आहेत त्यांना सुरवातीला नोटीस पाठविणे, नंतर अंतिम नोटीस देणे आणि अखेर मिळकत जप्तीची कारवाई करणे अशी एक सर्वसाधारण कायदेशीर पध्दत आहे. अन्यथा न्यायालयातूनही वसुली करता येते. मात्र आपण थेट कार, टीव्ही जप्त करण्याचा इशारा देताय, हे अत्यंत गंभीर आहे. प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे वसुलीची पध्दत अवलंबिली तर एखादा अनुचित प्रकार घडू शकतो, त्याला प्रशासन जबाबदार राहील.