पिंपरी – पवना धरणातील पाणी उपसा करणाऱ्या यंत्रणेच्या हायड्रो सिस्टममध्ये शुक्रवारी (दि. 17) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शहराला आज विस्कळीत पाणी पुरवठा झाला. शनिवारी (दि. 18) रात्री उशिरापर्यंत तांत्रिक बिघाड दरुस्त करण्याचे काम सरु होते. यात अपयश आल्यास रविवारी (दि. 19) होणारा पाणी पुरवठा देखील विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पवना धरण क्षेत्रात एकूण 13 पंप कार्यान्वित आहेत. शुक्रवारी रात्री यातील 2 पंप तांत्रिक बिघाड होऊन बंद पडले. त्यामुळे शहराला दिवसाआड होणारा पाणी पुरवठा ऐन महाशिवरात्रीच्या दिवशीच विस्कळीत झाला. त्यामुळे शहराच्या बहुतांश भागाला पुरेसे पाणी मिळाले नाही. तर, काही भागात सकाळी होणारा पाणी परवठा वेळेत झाला नाही. त्यामुळे ऐन नागरिकांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागली आहे.
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, तांत्रिक त्रुटी शोधण्यात पाटबंधारे व विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. ही यंत्रणा खोळंबून 32 तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेला. तरी देखील दरुस्ती होत नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उद्या रविवारी (दि. 19) देखील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
…म्हणून पुरवठ्यावर परिणाम
पवना धरणातील पाणी उपसा यंत्रणेतील टप्पा क्रमांक 1 आणि 2 ची लेवल कमी झाली आहे. त्यामुळे धरणातून पुरेसा पाणी उपसा करण्यात अडचणी आल्यामुळे पुढे होणा-या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. शहरातील नागरिकांना दिवसाआड होणारा पुरेसा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आली.
धरणातील पाणी उपसा यंत्रणेतील हायड्रो सिस्टममधील तांत्रीक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. दुरुस्ती झाल्यानंतर पाणी उपसा यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाईल. त्यानंतर शहराला पुरेसे पाणी सोडले जाईल.
– बाबासाहेब गलबले, कनिष्ठ शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका