वडगाव मावळ – तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ शहरातील पंचायत समिती चौकात अनधिकृतपणे मोठमोठे व्यावसायिक आणि राजकीय होर्डिंग लावले जात आहेत. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या होर्डिंगमुळे एकीकडे शहराचे विद्रुपीकरण होत असून दुसरीकडे मात्र नगर पंचायतीला लाखो रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागत आहे.
वडगाव मावळ शहरातील पंचायत समिती समोरील चौकात काही दिवसांपासून केवळ राजकीय होर्डिंग्ज पहायला मिळायचे. या होर्डिंगचा आकार देखील छोटा असायचा. मात्र अलीकडच्या काळात या ठिकाणी बांबू व लोखंडी स्ट्रक्चर उभारून त्यावर मोठमोठ्या आकाराचे होर्डिंग लावले जात आहे. हौसिंग सोसायटी, शाळा, हॉटेल, मंगल कार्यालये यांची फुकटात जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत.
वडगाव मावळ हे तालुक्यातील मुख्य ठिकाण असल्याने याठिकाणी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. यामुळे तालुक्यातील नागरिकांपर्यंत आपली जाहिरात मोफत पोहचिण्यासाठी अनेकजण या चौकात अनधिकृतपणे मोठ मोठे बॅनर व होर्डिंग लावत आहेत. वडगाव मावळ नगर पंचायतीच्या हद्दीत होर्डिंग लावायचे असल्यास त्यास परवानगी घेणे आवश्यक असते. परवानगी घेताना पंचायत समितीकडून शुल्कही आकारले जाते. त्यामुळे नगर पंचायतीच्या तिजोरीत भर पडते. यातूनच शहरातील विकासकामांसाठी लाखो रुपयांचा निधी उभा राहतो.
पूर्वी पंचायत समिती चौकात एक किंवा दोन होर्डिंग असायचे. मात्र प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याने आता या चौकात सात ते आठ होर्डिंग्ज पहायला मिळत आहे. हा चौक विविध जाहिरातींनी भरून गेला आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. येथे लागणाऱ्या होर्डिंगपैकी बहूतांश होर्डिंग हे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे असतात. तसेच जे व्यावसायिक होर्डिंग लागतात ते देखील राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या व्यावसायाचे असतात. आपण जर या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली तर राजकीय नेत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भिती अधिकाऱ्यांना वाटत असते. त्यामुळे अधिकारी अशा फलकांकडे दुर्लक्ष करतात. तर कधी कधी दाखविण्यापुरती कारवाई केली जाते. मात्र त्यावेळी देखील कारवाईत भेदभाव झाल्याचा आरोप होतो. लाखो रुपयांचा महसूल बुडत असून देखील नगरपंचायत प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जागा मिळेल तिथे फलक लावण्याचे काम राजकीय नेते करीत आहेत. मात्र प्रभागातही नगरसेवकाचे फलक तसेच ठेवून विरोधकांच्या फलकांवरच कारवाई होते.
अनधिकृत होर्डिंगबाबत प्रसिद्धी माध्यमांनी विचारणा केली तर प्रशासन केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम करते. यामुळे अनाधिकृत होर्डिंगवर खरोखरच निष्पक्षपातीपणे कारवाई करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील अनाधिकृत होर्डिंग्ज व फ्लेक्स बोर्ड यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढील काळात लवकरच अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करणार आहोत.
– प्रवीण निकम, मुख्याधिकारी, वडगाव मावळ नगर पंचायत