पिंपरी -परिवहन खात्याने राज्यभरातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत (आरटीओ) 65 सिम्युलेटर (संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा) लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता रस्ता सुरक्षा निधीतून 3 कोटी 90 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. राज्यातील सर्व उपप्रादेशिक कार्यालयाला एक परंतु पिंपरी-चिंचवडला दोन सिम्युलेटर मिळणार आहेत.
राज्यात 15 प्रादेशिक परिवहन कार्यालय तर जवळपास 35 उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. यापैकी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांत व पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयात प्रत्येकी दोन तर अन्य उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत प्रत्येकी 1 सिम्युलेटर लावले जाणार आहे. हे सिम्युलेटर लावण्यासाठी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयांत तातडीने जागा निश्चित करण्यासह संबंधित संस्थेला सर्व मदत करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.
सिम्युलेटर लागल्यावर त्यावर कायम वाहन चालवण्याचा परवाना घेण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. सध्या एका उमेदवाराच्या वाहन चालवण्याच्या परीक्षेसाठी 3 ते 4 मिनिटांचा वेळ दिला जातो. परंतु सिम्युलेटरवर हा वेळ 15 मिनिटांच्या जवळपास वाढण्याची शक्यता आहे.
वेगवेगळ्या परिस्थितीतवाहन चालविण्याची चाचणी
सर्व रस्त्यांवर प्रत्यक्ष वाहन चालविण्याच्या प्रत्यक्ष अनुभवाऐवजी संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालवण्याची सिम्युलेटर ही यंत्रणा आहे. वाहन चालविताना चालकाला पाऊस, घाटाचा रस्ता,चढ-उतार, हायवे, बोगदा, कच्चा रस्ता अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून वाहन चालविण्याची टेस्ट या सिम्युलेटरवर घेतली जाणार आहे. चालक या मशीनच्या “ड्रायव्हिंग सीट’वर बसल्यानंतर तो कसे वाहन चालवितो याचे संगणकावर रेकॉर्डिंग होईल. चालकाने केलेल्या चुकांचीदेखील नोंद केली जाणार आहे. वाहन चालविणे संपल्यानंतर त्याचा अहवाल येऊन चालकाच्या चुका कळणार आहेत.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयावर शिकाऊ व पक्के लायसन मिळविण्यासाठी कायम मोठा ताण असतो. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन सिम्युलेटर बसविण्यात येणार आहेत. त्याकरिता कार्यालयाच्या मोशीमधील इमारतीमध्येच जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड