पुणे – इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा आणि मराठी शाळांत घटत्या पटसंख्येमुळे गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या तब्बल 60 शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. त्याच वेळी पालिकेने जवळपास 55 शाळांचे रुपांतर इंग्रजी माध्यमात केले आहे. याचे जोरदार पडसाद मुख्यसभेत सोमवारी उमटले.
“मनपाच्या आणखी सहा मराठी शाळा बंद करून त्याच इमारतीमधील मूळ शाळेत अथवा नजीकच्या पालिका शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करावे,’ या प्रस्तावास सोमवारी मुख्यसभेत मान्यता देण्यात आली. या समायोजनास विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. त्यानंतर 48 विरोधात 30 मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रस्तावावरून सभागृह नेते गणेश बिडकर आणि विरोधी नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली.
महापालिकेच्या सहा शाळांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती ठेवण्यात आला होता. 2018 मधील हा प्रस्ताव करोनामुळे जवळपास दोन वर्षांनी मान्यतेसाठी आला होता. त्यामुळे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक प्रशांत जगताप, विशाल तांबे, अविनाश बागवे, पल्लवी जावळे यांनी प्रशासनाकडे खुलासा मागितला. त्यानंतर जावळे यांनी “मंगळवारपेठ येथील शाळा बंद करून तेथे घाईगडबडीने वैद्यकीय महाविद्यालय केल्याने मुलांची अडचण होणार असल्याने असे निर्णय घेऊ नयेत,’ अशी मागणी केली.
तर प्रशांत जगताप आणि दीपाली धुमाळ, पृथ्वीराज सुतार यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यानंतर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी “प्रशासन नियमानुसारच काम करत नसल्याने शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच 60 शाळा बंद झाल्या आहेत, त्याच वेळी 55 शाळांमध्ये इंग्रजीचे वर्ग सुरू केले असून प्रवेशाच्या रांगा लागत आहेत,’ असे सांगत “हे आमच्या पक्षाचे कर्तृत्व आहे, अनेक पक्षांना ते जमत नाही’ अशी खोचक टीका केली. त्यानंतर विरोधी पक्षाचे सर्वच नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी 55 शाळांची यादी द्यावी अशी मागणी केली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधीपक्षांचे नगरसेवक आमनेसामने आले. त्यात महापौरांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.