पिंपरी- टाळ-मृदंगाचा गजर करीत, भगव्या पताका नाचवत… विणेच्या झंकारात, ज्ञानोबा-तुकारामचा अखंड जयघोष अन् भाविकांच्या उत्सवाला आलेल्या उधाणात फुलांचा वर्षावात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे औद्योगिकनगरीत रविवारी (दि.11) सायंकाळी साडेपाच वाजता मोठ्या उत्साहात आगमन झाले. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी पिंपरी-चिंचवडनगरी दुमदुमून निघाली. निगडीतील भक्ती शक्ती चौकात भाविकांचा अभूतपूर्व असा उत्साह दिसून आला.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि.10) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिराला प्रदिक्षणा घातल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहूतीलच इनामदार वाड्यात झाला. रविवारी सकाळी शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पालखी शहरात दाखल झाली.
निगडीतील भक्ती-शक्ती चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी दिंडी प्रमुखांना पालिकेच्या वतीने कापडी शबनम पिशवी, त्यामध्ये माहिती पुस्तिका, आरोग्य किट, हार, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त रविकिरण घोडके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. शिवाजी ढगे, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, ज्ञानदेव जुंधारे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार महेश लांडगे, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पालखी रथाचे सारथ्य देखील केले.
पालखी सोहळ्यामुळे शहर परिसर भक्तिमय झाला आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी निगडीतील रस्त्याच्या दुर्तफा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
विविध सामाजिक संस्थांकडून अन्नदान
विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रसाद वाटप, पाणीवाटप, चहापाणी, चप्पल दुरुस्ती, मॉलिश, दाढी-कटींग, आरोग्य तपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येत होत्या.
हरित वारी, निर्मल वारीचा संदेश
पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हरित वारी, निर्मल वारी हा संदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात आला. त्याअंतर्गत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना पालिकेच्या उद्यान विभागातर्फे साग, रक्तचंदन, बहावा, अर्जुन, करंज, जांभुळ, आंबा, चिंच, विलायती चिंच, गुलमोहर इ. प्रकारच्या वृक्षांच्या एक लाख बियांच्या कागदी पाकिटांचे वाटप करण्यात आले.
पोलिसांचा बंदोबस्त अन् सीसीटीव्हीची नजर
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सुमारे दोन लाख भाविक सहभागी झाले आहेत. भाविकांची संख्या मोठी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पालखी मुकामाच्या ठिकाणी आकुर्डीतील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात पोलिसांच्या बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था
करण्यात आली.