वॉशिंग्टन – अमेरिकेत पहिल्यांदाच हिंदू अमेरिकन संमेलन आयोजित केले जाणार आहे. अमेरिकेतील हिंदू समुदायाने एकत्र येऊन आयोजित केलेल्या या संमेलनाचे नाव “हिंदू अमेरिकन समिट फॉर पॉलिटिकल एन्गेजमेंट’ असे असणार असून, अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटलमध्ये या संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. इतर अनेक मान्यवरांसह अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सभापती केविन मॅक्कार्थी हे या संमेलनाला संबोधित करणार आहेत.
अलीकडेच स्थापन झालेल्या “अमेरिकन्स फॉर हिंदूज’च्या राजकीय कृती समितीच्या माध्यमातून आणि अन्य 20 सहयोगी संघटनांच्या सहकार्याने या संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. अमेरिकेच्या कॅपिटल भवनामध्ये दिनांक 14 जून रोजी हे संमेलन होणार आहे. देशभरातील हिंदू समुदायाचे प्रश्न लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी देशभरातील 130 पेक्षा अधिक हिंदू नेते या संमेलनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये फ्लोरिडा, न्यूयॉर्क, बोस्टन, टेक्सास, शिकागो आणि कॅलिफोर्नियामधील 20 हिंदू संघटना सहभागी होणार आहेत. या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी काही भारतीय संघटनादेखील अमेरिकेमध्ये आपले प्रतिनिधी पाठवणार आहेत.
अमेरिकेतील हिंदू चांगले काम करत आहेत. मात्र राजकीयदृष्ट्या ते खूप मागे आहेत. राजकीयदृष्ट्या हिंदूंना कमी लेखले गेले नाही. मात्र आता परिस्थिती बदलते आहे. कॅलिफोर्नियामध्ये दुर्दैवाने जातीच्या आधारे भेद केला जातो आहे, असे कार्डिओलॉजिस्ट डॉ. रोमेश जोपरा यांनी सांगितले. हिंदूंमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न “इक्वॅलिटी लॅब्ज’ आणि “केअर’सारख्या संघटना करत आहेत. हिंदू विरोधी कारवाया अशा संस्था करत आहेत. म्हणूनच हिंदू अमेरिकन म्हणून एकत्र येण्याची गरज वाटल्याचेही त्यांनी सांगितले.
सभापती मॅक्कार्थी हे या संमेलनाचे बीजभाषण करणार आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाचे काही संसद सदस्य या संमेलनाला संबोधित करणे अपेक्षित आहे. अमेरिकन संसदेच्या प्रतिनिधीगृहामध्ये हिंदू अमेरिकनांच्या हिताच्या रक्षणासाठी एक राजकीय गट स्थापन करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.