पिंपरी – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी (दि.11) शहरात आगमन झाल्यानंतर आनंदपर्वाला सुरूवात झाली. या सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी निगडीत उपस्थित असलेले भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी तुकोबारायांच्या पालखी रथाचे सारथ्य केले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आवर्जुन हजेरी लावली. पालखीचा निगडीमधून शहरात प्रवेश झाल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने दिंडी प्रमुखांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागतानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरातील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना झाली.
आमदार लांडगे म्हणाले की, तुकोबारायांच्या पालखीचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभले. भाजप आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. सर्व भेद अभेद बाजूला सारुन हरिचे नाम प्रेमाने उच्चारावे हीच खरी हरीची सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव केवळ भक्तीभावानेच संतुष्ट होतो म्हणजे हरीनाम घोष चालू आहे तेथेच हा हरी राहात असतो.