पिंपरी-चिंचवड : सुरक्षा आवरणाअभावी तीन हजार रोहित्र धोकादायक

  • आता अवघ्या तीनशे रोहित्रांना महावितरण पत्र्याचे सुरक्षा आवरण बसविणार  
  • रोहित्रांची देखभाल, दुरुस्ती युद्धपातळीवर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक वर्दळी तसेच वस्त्यांच्या ठिकाणी असलेल्या आणखी 300 रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्यात येणार आहे. इंद्रायणीनगर येथील रोहित्राच्या स्फोटात एका चिमुरडीसह तीन बळी घेतल्यानंतर महावितरण कंपनीला शहाणपण सुचले आहे. विशेष म्हणजे शहरातील उघड्यावर असलेल्या 3 हजार 758 पैकी अवघ्या 741 रोहित्रांनाच पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्यात येत आहेत. उर्वरित तीन हजारांहून अधिक रोहित्र सुरक्षा आवरण नसल्याने धोकादायक स्थितीत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.

इंद्रायणीनगरमधील रोहित्राच्या स्फोटात एका चिमुरडीसह एकून तीन महिलांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर महावितरणच्या एका अतिरिक्‍त अभियंत्यासह एकूण तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही 25 सप्टेंबरला अजमेरा कॉलनीतील एका रोहित्रातून ऑईल गळती झाल्याने या रोहित्राचादेखील स्फोट झाला. सुदैवाने यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. याबाबत दै. “प्रभात’मध्ये 26 सप्टेंबर रोजी “ट्रान्सफॉर्मरपासून अपघाताचा धोका कायम’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची महावितरणने गंभीर दखल घेतली.

दै. प्रभातमधील प्रसिद्ध झालेले वृत्त

शहरातील सुमारे तीनशे रोहित्रांना आवरण बसविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र तरीही शहरातील तीन हजारांहून अधिक रोहित्र सुरक्षा आवरणाअभावी धोकादायक स्थितीत असल्याचे बाब महावितरणकडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातूनच उघड झाली आहे.

दरम्यान, पिंपरी व भोसरी शहरामधील रोहित्रांच्या परिसरातील साफसफाई तसेच देखभाल व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सोमवारपासून (दि. 28) 1901 रोहित्रांच्या परिसरातील गवत, झुडपे, वेली काढणे, रोहित्रांची तपासणी करणे, आवश्‍यकतेनुसार दुरुस्ती करणे आदी कामे करण्यात आली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात महावितरणचे पिंपरी व भोसरी असे दोन विभाग आहेत. सद्यस्थितीत पिंपरीमध्ये 2 हजार 884, तर भोसरीमध्ये 3 हजार 173 असे एकूण 6 हजार 57 रोहित्र आहेत. यापैकी 2 हजार 299 हे बंदिस्त खोलीमध्ये, तर उर्वरित 3 हजार 758 रोहित्र सार्वजनिक ठिकाणी आहेत.

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना महावितरणकडून लोखंडी जाळ्यांचे कूंपण घातलेले आहे. तसेच रस्त्याबाजूला, वस्त्यांजवळ, बाजार किंवा नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या 441 रोहित्रांना यापूर्वीच लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्यात आले आहे. या सुरक्षा आवरणामुळे रोहित्रातील तांत्रिक बिघाडामुळे ऑईल गळती, स्पार्किंग आदींचा परिसरासाठी धोका राहणार नाही. आता आणखी 300 रोहित्रांना हे सुरक्षा आवरण लावण्यात येणार आहे. तसेच महावितरण बसवित असलेल्या रोहित्रांमध्ये वीज खांबावर असलेल्या 200 आणि सिमेंट क्रॉंक्रिटच्या चौथऱ्यावर असलेल्या 100 रोहित्रांचा समावेश आहे.

रोहित्रांच्या देखभालीसाठी 19 एजन्सीचे पॅनल…
महावितरणकडून वर्षभर देखभाल व दुरुस्तीचे काम केली जातात. यामध्ये रोहित्रांची विशेष काळजी घेऊन सर्व प्रकारची देखभाल व दुरुस्ती केली जाते. ही कामे नियमित व जलदगतीने करण्यासाठी यंदापासून तीन वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी 19 एजन्सीजचे पॅनेल तयार करण्यात आले आहे. या एजन्सीजमुळे महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांना आणखी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. तसेच संयुक्तपणे रोहित्राची योग्य देखभाल करण्यात येत आहे.

रोहित्राभोवतीचे अतिक्रमण हटविण्याची महपालिकेकडे मागणी
शहरामध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या रोहित्राखाली छोटे व्यवसाय करणारे किंवा रोहित्राजवळच घराचे किंवा अन्य अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी महावितरण आणि पिंपरी चिंचवड महापालिका संयुक्‍तपणे कारवाई करणार आहे. महावितरणने याबाबत आग्रही भूमिका घेत महापालिकेकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. विद्युत यंत्रणेजवळ असलेल्या अतिक्रमणाची माहिती महावितरणकडून नियमित स्वरुपात महापालिकेला दिली जाणार आहे. याबाबत महापालिका व महावितरण प्रशासनाची एकत्रित बैठक पार पडली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.