पिंपरी – ताथवडे येथे रात्री अकरा वाजताच्या सुमारास भीषण गॅस स्फोट झाला. टॅंकरमधून सिलेंडरमध्ये गॅस चोरी करत असताना एकामागोमाग नऊ सिलेंडरमधील गॅसचे स्फोट झाला. या आगीत गॅस टॅंकरची चाके जळाली. मात्र सुदैवाने टॅंकरला काहीच झाले नाही. या टॅंकरमध्ये तब्बल 21 टन गॅस (दीड हजार सिलेंडर इतका गॅस) होता. या टॅंकरचा स्फोट झाला असता तर दोन ते तीन किलोमीटरच्या परिसर बेचिराख झाला असता. शहरात रहिवासी भागात अशा जीवघेण्या प्रकारचे गॅसचोरीचे रॅकेट सुरू असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
गॅस स्फोट प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री अकरा वाजताच्या सुमारास ताथवडे येथील ब्लॉसम शाळेच्या शेजारील मोकळ्या जागेत घडली.
महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुलकुमार राजदेवराम (रा. थेरगाव), मोहम्मद रशीद मोहम्मद नसीम (रा. उत्तर प्रदेश), चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महिपाल चौधरी आणि आरोपी राहुलकुमार या दोघांनी तिरुपती कॅरिअर नाव असलेला गॅस टॅंकर (जीजे 16 एडब्ल्यू 9045)मधून चालक मोहम्मद रशीद याच्याशी संगनमत करून प्रोपिलिन गॅसची बेकायदेशीरपणे चोरी केली. बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडरमध्ये भरताना गॅसचा आगीशी संपर्क येऊन भडका उडाला. त्यामुळे सर्वजण पळून गेले. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे तब्बल नऊ स्फोट झाले.
बाजूलाच असलेल्या ब्लॉसम शाळेच्या तीन बसलाही आग लागली. तसेच ज्या टेम्पोतून सिलेंडर आणले होते तो टेम्पोही जळून खाक झाला. आग लागल्यावर त्याचे लोळ दूरवरूनही दिसत होते. त्यातच एकामागोमाग एक असे नऊ स्फोट झाल्याने आसपासच्या रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅसचा काळाबाजार करण्यासाठी जागा मालक चंद्रकांत सपकाळ यांनी नियमितपणे आपली जागा उपलब्ध करून दिली.
27 सिलेंडर घेतले ताब्यात अग्निशामक दलाने घटनास्थळावरून एकूण 27 गॅस सिलेंडर ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी नऊ सिलेंडरमधील गॅसचा स्फोट झाला आहे.आरोपीवर दुसऱ्यांदा गुन्हा आरोपी महिपाल चौधरी याच्यावर पूर्वी रावेत पोलीस ठाण्यात गॅस चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. असे असतानाही त्याने गॅस चोरी सुरू ठेवली. रावेतमधून आपले बस्तान त्याने ताथवडे येथे हलविले.
घराचा दरवाजा निखळून पडला
ज्या ठिकाणी सिलेंडरचे स्फोट झाले तेथून अवघ्या 300 फूट अंतरावर जागा मालक चंद्रकांत सपकाळ यांचे घर आहे. ते पितराकरिता नातेवाइकांकडे गेले असल्याने आग लागली तेव्हा घरी कोणीच नव्हते. मात्र स्फोटानंतर एक सिलेंडर दरवाजावर येऊन आदळल्याने दरवाजा निखळून पडला. तर घटनास्थळी बेचिराख झालेल्या टेम्पोचे छत उडून झाडावर पडलेले आढळून आले.
शाळेला सुट्टी
ज्या ठिकाणी घटना घडली त्यालगत ब्लॉसम शाळा आहे. या शाळेची रविवारी कात्रज येथे सहल गेली होती. तसेच रात्री आगीची घटना घडून त्यात शाळेच्या तीन बस भस्मसात झाल्या. त्यामुळे सोमवारी शाळेला सुट्टी देण्यात आली.