पिंपरी – मुलगी आजारी असल्याने मुलीला दवाखान्यातून घरी आणले, दुपारनंतर ती लगबगीने कामावर निघाली. मात्र, मुलीने मी आजार आहे, तु कामावर जाऊ नको असे म्हटल्याने तीने कामावर जाण्याचे टाळले. त्यामुळे तीचा जीव वाचला. ही कहाणी आहे. स्फोट झालेल्या कारखान्यातील सावित्रा नवनाथ सरवदे या महिलेची.
सावित्रा या रूपीनगरमध्ये राहत असून त्यांचे मुळगाव लातुर जिल्ह्यातील खुंटेगाव (ता. औसा) हे आहे. त्यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. त्यांचे पती मालवाहूक वाहन चालकाचे काम करतात. मुलांचे शिक्षण व लग्नांसाठी हातभार लागेल, यासाठी त्या दोन वर्षापासून स्पार्कल कँडल कारखान्यात काम करत होत्या. त्यांच्याबरोबर 16 महिला काम करत होत्या. शुक्रवारी (दि. 8) त्यांची मुलगी आजारी असल्याने त्यांनी कारखान्याच्या मालकाला न सांगता सुट्टी घेतली.
मुलीला त्या दवाखान्यातून घरी घेऊन आल्या. मात्र, दुपार नंतर कामावर गेल्यास अर्ध्या दिवसाचा पगार मिळेल, या आशेने त्या कामावर जाण्याच्या तयारीत होत्या. मात्र, मुलीने त्यांना जाऊ नकोस असा खुपच आग्रह केला. त्यामुळे त्या कामावर गेल्या नाहीत. त्यावेळी त्यांनी कारखान्यातील आपल्या सहकारी महिलांना व्हिडीओ कॉल केला. रेणुका, संगिता, पुनम, अपेक्षा यांच्याशी बोलणे झाले.
सगळ्यांनी त्यांना कामावर येण्याचा आग्रह केला. मात्र, त्यांनी सुट्टीच घेतली असल्याचे त्यांना सांगितले. शेवटी त्यांना त्यांच्या सहकारी महिलांनी बाय..बाय.. केले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या ओळखीच्यांनी फोन करून घटनेची माहिती दिली. याबाबत अधिक माहिती देताना सावित्रा म्हणाल्या की, मला माहिती कळताच चक्कर आली, काल रात्री पासून आमच्या घरात अन्न शिजले नाही. माझ्या पुढे सोबत काम करणाऱ्या बायकांचे चेहरे दिसत आहेत.