पिंपरी – रिक्षा चालकांच्या तक्रारींसाठी आरटीओने सुरू केलेल्या ईमेल आयडीवर पिंपरी-चिंचवडमधून चार महिन्यांत एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. ईमेल आयडीची माहिती बहुतांश नागरिकांना नाही. परिणामी रिक्षा चालकांविरोधात तक्रार करायची कुठे, असा प्रश्न शहरातील नागरिकांना भेडसावत आहे. रिक्षा चालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी सुरू केलेला हा ईमेल आयडी केवळ शोभेचा ठरत असल्याचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये चढाओढच सुरू असते. रिक्षामध्ये बसलेले प्रवासी उतरवून इतर रिक्षांमध्ये बसविण्याच्या घटना देखील घडतात. या चढाओढीत प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. या त्रासाबरोबरच पैशांवरून रिक्षा चालक, प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग वारंवार उद्धवतात. रिक्षाचालकांकडून प्रवाशांना लुटल्याच्या आणि मारहाण केल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्याबाबत थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला परंतु आरटीओच्या ई-मेलवर तक्रार गेली नाही. याचाच अर्थ की, नागरिकांना याबाबत माहितीच नसल्याचे
दिसून येत आहे.
रिक्षा चालकांच्या या मनमानीला आळा घालण्यासाठी आरटीओकडून ऑक्टोबर 2022 मध्ये ईमेल आयडी सुरू करण्यात आला आहे. अनेक प्रवाशांना या ईमल आयडीची माहितीच नाही. त्या बाबतची माहितीचनागरिकांपर्यंत पोहचविली नाही.
तक्रारी केल्यास कारवाई होणार
आरटीओच्या ाह14िीीेशर्लीींळेपऽसारळश्र.लो या ईमेल आयडीवर तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत अधिकारी तक्रार असणारी रिक्षा ब्लॅक लिस्टमध्ये सहभागी करतात. कोणत्या प्रकारची तक्रार आहे, त्यानुसार त्या रिक्षावर दंडाची आकारणी केली जाते. संबंधित रिक्षा आरटीओ कार्यालयात कामानिमित्त गेल्यानंतर दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल, अशी माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
रिक्षातच माहिती देण्याची मागणी
नियम, नियमबाह्य वर्तन केल्यास होणारी कारवाई, याबाबत तक्रार करावयाचा ई-मेल ऍड्रेस प्रत्येक रिक्षामध्ये खरेदी करतेवेळी दर्शनी भागी माहिती लावणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आपण कशाबाबत आणि कुठे तक्रार करू शकतो, याची माहिती प्रवाशांना होईल. या बदलामुळे रिक्षाचालकांच्या मनमानीलादेखील चाप बसू शकतो. अनेक रिक्षा चालकांची हा बदल करण्याची तयारी आहे. त्यामुळे प्रवाशांनादेखील दिलासा मिळू शकेल.
दिवाळीमध्ये कार्यालयाने ईमेल आयडी सुरू केलेला आहे. अद्याप त्यावर एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार आल्यास संबंधित रिक्षाचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश करून त्यावर योग्य
कारवाई करू.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड