पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न आयुक्तांनी करु नये. ५५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची कार्यवाही त्वरीत रद्द करावी, अन्यथा या निर्णयाविरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी महौपार संजोग वाघेरे पाटील यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता नागरिकांना भुलथापा देऊन भाजपाने ताब्यात घेतली. त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात महापालिकेत स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीटपासून असंख्य मोठ्या प्रकल्पाच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडकरांच्या तिजोरीची लूट करण्यात आली. महापालिकेने मागील काळात राबविलेले अनेक प्रकल्प फसलेले आहेत. ते पुर्णत्वास गेलेले नाहीत. त्यात महापालिका आयुक्त म्हणून आपण आर्थिक शिस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. आपण प्रचंड राजकीय दबावाखाली काम करत आहात, असा आरोप वाघेरे पाटील यांनी केला आहे.
महापालिका प्रशासकाकडून शहरातील करदात्यांचे नुकसान होत आहे. टीडीआर प्रकरणात आपण घेतलेले निर्णय वादाच्या भोव-यात सापडले आहेत. हा प्रकल्प स्थगित करण्याची वेळ तुमच्यावर आली. चुकीचे निर्णय घेऊन या शहराला चुकीच्या दिशेने नेले जात आहे. महापालिकेची आर्थिक बाजू भक्कम करण्याऐवजी राजकीय व्यक्तीच्या हातचे बाहुले बनून आयुक्त काम करत आहेत. हे नव्याने कर्ज काढण्याच्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे, असा आरोप वाघेरे पाटील यांनी केला आहे.
सध्या महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम सुरू आहे. नदी सुधार प्रकल्पासाठी महापालिकेने २०० कोटींचे कर्ज घेतले. आता पुन्हा नव्याने ५५० कोटींचे कर्ज काढले जात आहे. आर्थिक नियोजन न करताना महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम करु नका. प्रशासकीय राजवटीत घेण्यात आलेला हा चुकीचा निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा. अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वाघेरे पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.