मुख्य सूत्रधार गणेश मारणे याला पोलीस कोठडी
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे पुरवणी जबाबात सांगितले असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी (दि.१) न्यायालयात दिली. पोलिसांनी या गुन्हयासंबंधीचा गोपनीय अहवाल न्यायालयात सादर केला आहे. दरम्यान मुख्य सूत्रधार गणेश मारणे याला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मोक्का न्यायालयाने दिला.
कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील फरारी मुख्य आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी बुधवारी (दि. ३१) रात्री पाठलाग करून संगमनेरजवळ नाशिक रोड येथून अटक केली. त्याला गुरुवारी (दि. १) विशेष मोक्का न्यायाधीश व्ही .आर.कचरे यांच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की, आत्तापर्यंत या गुन्हयात एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोघे या गुन्हयाचे मुख्य सूत्रधार असून, या दोघांनी खुनाचा कट रचला.
५ जानेवारीला शरद मोहोळचा खून झाला. त्यानंतरच्या वीस दिवसांमध्ये तो फरार होता. या काळात बेंगलोर, ओरिसा, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक या पाच राज्यात तो फिरला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच मोहोळचा खून केल्यानंतर आम्ही गणेश मारणेची पोरं आहोत, असे आरोपींनी सांगितले आहे.
प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी फिर्यादीमध्ये गणेश मारणे याचे नाव आहे. यापूर्वी त्याच्यावर ८ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचे स्वरूप बघता त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. बचाव पक्षातर्फे राहुल देशमुख यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गणेश मारणेयाला ९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, मोक्का लागल्याने पोलिसांनी पूर्वी अटक केलेल्या १५ आरोपींना न्यायालयात हजर करण्यास परवानगी देण्याचा आर्ज केला आहे.