- दररोज 15 प्लाझ्माची आवश्यकता – नागरिकांमध्ये गैरसमज
पिंपरी – शहरात करोना संसर्ग वाढला आहे. या आजारावर प्लाझ्मा थेरपी वरदान ठरली आहे. मात्र शहरात प्लाझ्माच उपलब्ध होत नसल्याने गैरसोय झाली आहे. दररोज 15 प्लाझ्माची आवश्यकता आहे. मात्र दिवसाला मोठ्या मुश्कीलने एक प्लाझ्मा मिळत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये गैरसमज पसरल्यामुळे ते प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नाहीत.
करोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेतला जातो. संबंधित व्यक्तीच्या शरीरातील अँटिबॉडी तसेच विषाणूबरोबर लढा देणाऱ्या पेशी म्हणजेच प्लाझ्मा होय. बरे झालेल्या व्यक्तींचे रक्त घेऊन त्यातून प्रक्रियेद्वारे प्लाझ्मा वेगळा केला जातो. त्यानंतर अत्यवस्थ रुग्णाच्या शरीरात त्याचे संक्रमण केले जाते. त्याद्वारे रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तसेच करोनाच्या विषाणूबरोबर लढणाऱ्या पेशी तयार होतात. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आतापर्यंत 35 जणांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आहेत. ते सर्वजण ठणठणीत बरे झाले आहेत. बाकी अत्यवस्थ रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्माची आवश्यकता आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने उपचारासाठी अडचण येत आहे. जे रुग्ण करोनातून बरे झाले आहेत, त्यांना प्लाझ्मा दान करावे. परंतु त्यासाठी ते तयार होत नसल्याचा अनुभव येत आहे.
प्लाझ्मा दान करण्याची प्रक्रिया
रक्तामध्ये लाल व पांढऱ्या पेशी असतात. रक्तदान जसे केले जाते तसेच प्लाझ्मा दान केले जाते. दोन तासांची ती प्रक्रिया असते. व्हील चेअरवर दात्याला बसवून त्याच्या शरीरातील 300 मिली रक्त काढले जाते. पुढे रक्ताचे मशिनमधून सेल मागे टाकले जातात. त्या प्लाझ्मामध्ये करोनाविरुद्ध लढण्याचे घटक असतात. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढते.
जे करोनामुक्त झाले आहेत ते एक महिन्यानंतर प्लाझ्मा दान करू शकतात. जे व्यक्ती असे आहेत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान करण्यासाठी यावे. त्याने दुसऱ्या रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. प्लाझ्मा दान केल्याने व्यक्तीला कोणताही अपाय होत नाही. त्यामुळे या लढाईमध्ये जे नागरिक दान करू शकतात त्यांनी साथ देण्याची आवश्यकता आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम रुग्णालय