पिंपरी, दि. 11 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना विनापरवाना मांजर पाळल्यास महापालिका कारवाई करणार आहे. मांजर पाळण्यास परवाना दिल्यास त्याची माहिती संकलित करुन त्यानुसार मांजराच्या आरोग्य, उपद्रवाबाबतच्या उपाययोजना यावर नियोजन करण्यासाठी महापालिका मांजरांना देखील ऑनलाइन परवाना देणार आहे. नवीन परवान्याला 75, नुतनीकरणाला 50 आणि विलंब शुल्क 10 रुपये आकारले जाणार आहे. तसेच भटक्या मांजरीचे प्रमाण वाढून उपद्रव होण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे निर्बिजीकरणही करण्यात येणार आहे.
मांजरांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची कार्यवाही तसेच उपाययोजना करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणाला स्थायी समितीने मान्यता दिली. बेवारस, भटक्या मांजरीचे प्रमाण वाढून उपद्रव होण्यापासून रोखण्यसाठी त्यांचे संतती नियमन शस्त्रक्रिया म्हणजेच निर्बिजीकरण, लसीकरण करणे आवश्यक आहे. संतती नियमन शस्त्रक्रिया कार्यक्रम प्रभावीपणे राबवून वाढत्या मांजरींची संख्या आटोक्यात आणणे शक्य आहे.
संख्या आटोक्यात आल्यावर आरोआप त्यांच्यापासून उपद्रव नियंत्रीत राहणार आहे. लसीकरण केल्याने त्यांच्यापासून होणारा रोग संसर्ग साखळी खंडित होऊन मानवी आरोग्य अबाधित राखणे शक्य होणार आहे. पशुवैद्यकीय विभागामार्फत नेहरुनगर येथे पुण्यातील कॅनाईल कंट्रोल ऍण्ड केअर ट्रस्ट या संस्थेमार्फत भटक्या, मोकाट श्वानांवर संतती नियमन शस्त्रक्रिया विनामोबदला करण्यात येत आहे. याठिकाणी कॅट वार्ड विकसित करण्याचे कामकाज चालू आहे. या संस्थेसोबत भटक्या मांजराच्या संतती नियमन शस्त्रक्रिया करण्याबाबत पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. संस्थेने विनामोबदला शस्त्रक्रिया करण्यास तयारी दर्शविली आहे.