पिंपरी (प्रकाश यादव) – शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या विविध भागातील रस्ते, उद्याने, मोकळ्या जागा, महापालिका मालमत्तांच्या परिसरात तब्बल 32 लाख 16 हजार 799 झाडे असल्याचा दावा पालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे. मात्र, यामधील किती झाडे सध्यस्थितीत जिवंत आहेत, याची आकडेवारी उद्यान विभागाकडे उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच 2019 मध्ये शहरातील वृक्षगणना करण्यात आली होती. मात्र, या वृक्षगणनेचा अद्याप अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्यान विभागाच्या 32 लाख झाडांच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या वाढत असतानाच सिमेंटचे जंगल वाढत आहे. शहराची सुमारे 30 लाख लोकसंख्या आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील आकडेवारीनुसार शहरातील वाहनांची संख्या तब्बल 18 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणात मोठी भर पडत आहे. तसेच करोना काळात नागरिकांना शुध्द हवा आणि ऑक्सिजनचे चांगलेच महत्व कळाले आहे. त्यामुळे पर्यावरणपुरक वाहने वापरणे आणि वृक्षतोड रोखणे काळाची
गरज आहे.
नागरिकांना शुध्द हवा मिळावी, यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, उद्यानांमध्ये सध्यस्थितीत 32 लाख 16 हजार 799 झाडे असल्याचा दावा केला आहे. मात्र, 2019 मध्ये केलेल्या वृक्षगणनेचा अहवालच जाहिर केला नसल्यामुळे या वृक्षगणनेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. वास्तविकता दर पाच वर्षांनी शहरातील वृक्षांची गणना करणे गरजेचे असताना पाच वर्ष झाले तरी अहवालाच जाहीर होत नसेल तर पालिकेचा उद्यान विभाग किती “कार्यक्षम” हे यावरून दिसून येते.
महाराष्ट्रात 48 टक्के ग्रीन कव्हर असलेले एकमेव शहर आहे. 2019 मध्ये एका कंपनीमार्फत शहरातील वृक्षांची गणना झाली आहे. त्यानुसार 32 लाख 16 हजार 799 झाडे आहेत. संबंधित कंपनीने दिलेल्या झाडांच्या संख्येची पडताळणी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या मार्फत करण्यात येत आहे. आठ प्रभागापैकी पाच प्रभागाची पडताळणी पूर्ण झाली असून तीन प्रभागाची पडताळणी बाकी आहे. यानंतर शहरातील वृक्षांची अंतिम आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.
– रविकिरण घोडके, उपायुक्त, उद्यान विभाग
पाच वर्षांत सव्वा सहा लाख रोपांची लागवड
महापालिकेच्या उद्यान विभागाची शहरात रोपांची लागवड करण्याची जबाबदारी आहे. उद्यान विभागाने 2018 ते 2023 या पाच वर्षांच्या कालावधीत 6 लाख 80 हजार रोपांची लागवड करण्याचे उदिष्ट ठेवले होते. असे असताना उद्यान विभागाने 6 लाख 38 हजार 67 रोपांची लागवड केल्याचा दावा केला आहे. तर 2023-24 या आर्थिक वर्षांत 3 लाख रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.