पिंपरी-2023-24 या आर्थिक वर्षातील अवघ्या दोन महिन्यांत महापालिकेच्या कर संकलन विभागाने 204 कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. 25 टक्क्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये निवासी मालमत्ता धारकांची कर भरण्यात सर्वाधिक आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
शहरात 6 लाख 2 हजार 203 मालमत्ता आहेत. गतवर्षी कर संकलन विभागाने राबविलेले विविध उपक्रमांचा यंदाही फायदा होताना दिसत आहे. तसेच सिध्दी प्रकल्पाअंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, कोणत्याही विभागीय कार्यालयात कर भरण्याची सुविधा, करदात्यांच्या समस्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन अशा विविध बाबींमुळे दोन महिन्यांत 204 रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे. 6 लाख 2 हजार 203 मालमत्ता धारकांना पैकी 1 लाख 62 हजार मालमत्ता धारकांनी 204 कोटी 66 हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.
ऑनलाईन कर भरण्यास नागरिकांची मोठी पसंती मिळत असून 1 लाख 22 हजार 931 मालमत्ता धारकांनी 151 कोटी 96 लाख 28 हजार रूपयांचा ऑनलाईन कराचा भरणा केला आहे. विविध ऍपच्या माध्यमातून 2 हजार 746 जणांनी 2 कोटी 42 लाख 87 हजार, 5 हजार 669 जणांनी 16 कोटी 23 लाख रुपयांचा कर धनादेशाद्वारे जमा केला आहे. 27 हजार 683 नागरिकांनी 25 कोटी 85 लाख 83 हजार रूपयांचा रोख स्वरूपात कर
भरला आहे.
नोकरभरतीतून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास कर संकलन विभाग अधिक सक्षम होईल. विभाग अधिकाधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख कसा होईल यावर भर असणार आहे.
– शेखर सिंह, आयुक्त
निरंतर जप्ती कारवाई, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मालमत्ता सर्वेक्षण ही त्रिसूत्री विभागाला आखून दिलेली आहे. 1 हजार कोटीशिवाय थांबायचे नाही असे ठरवले आहे. संपूर्ण वर्षाचे सूक्ष्म नियोजन केले आहे.
– नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त
कर भरण्यात निवासी मालमत्ता धारकांची आघाडी
1 लाख 61 हजार 359 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल 1 लाख 46 हजार 91 निवासी मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यानंतर 11 हजार 675 बिगर निवासी, 2 हजार 789 मिश्र, 1 हजार 45 औद्योगिक तर 974 मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक 24 हजार 396 जणांनी तर सर्वात कमी पिंपरी नगरमध्ये फक्त 1 हजार 622 जणांनी कर भरला आहे.