पुसेसावळी – मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. ग्रामीण भागाती लोकांना अर्ज भरण्यात अनेक अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन, राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 8640467567 या मोबाइल क्रमांकावर केवळ मिसकॉलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आता सहज, सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत निधी मिळेल. लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण भागातील गरजूंना निधीसाठी मंत्रालयाचे दरवाजे झिजवावे लागतात. अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास, नव्याने प्रक्रिया करावी लागते. उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी रुग्णांची होणारी परवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षात घेतली. लाभार्थ्यांना फक्त मिसकॉलवर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे कर्करोगावरील उपचाराच्या मदतीसाठी सर्वाधिक अर्ज येतात. हे प्रमाण एकूण अर्जांच्या 25 टक्के आहे. त्या खालोखाल हृदयविकार, गुडघे व खुब्यांचे प्रत्यारोपण, अपघात, डायलिसिस, किडनी विकारावरील उपचारांच्या मदतीसाठी अर्ज येत आहेत.
भाजलेल्या, विजेचा धक्का बसलेल्या रुग्णांकडूनदेखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे अर्ज येत आहेत. यातील बहुतांश अर्ज अपूर्ण असतात. त्यामुळे मदत मिळण्यात अडचणी येतात. सध्या मिसकॉलवर ही सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी लवकरच अर्जासाठी ऍप बनवले जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल. एकाच वेळी सर्व अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना मदत कक्षाशी संपर्क साधावा लागणार नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
अर्जदाराने मोबाइल क्रमांकावर मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मिळेल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड होणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून तो भरावा. रुग्णाच्या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा स्कॅन करून पीडीएफमध्ये अपलोड करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवण्यासाठी आता फक्त मिसकॉल देण्याची आवश्कता आहे. या निधीतून मागील वर्षांत हजारो गरजूंना मदत दिल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.