पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सरळ सेवा भरतीचा निकाल शुक्रवारी (दि.2) रात्री जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये 15 पदांसाठी एकूण 368 जागाची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वेगवेगळ्या 15 पदांच्या 368 जागांसाठी मे 2023 मध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. त्यात 55 हजार जणांनी परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर 11 पदांसाठी 35 जागांचा निकाल 7 ऑगस्टला जाहीर झाला. पात्र सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक बुधवारी पार पडली. यामध्ये कागदपत्राची पुर्तता करणार्या उमेदवारांची निवड करण्यास समितीने मान्यता दिली. त्यानुसार अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेत सेवेत पदानुसार नियुक्त करून घेण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
पालिकेच्या कामाला मिळणरा गती
या भरतीमुळे अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा विविध पदांवर पिंपरी-चिंचवड पालिकेला या भरतीनंतर मनुष्यबळ मिळणार आहे.
खुल्या प्रवर्गातील प्रतीक्षा यादीसाठी उमेदवार उपलब्ध नाही
समाजसेवक पदाच्या दोन जागांकरिता खुल्या सर्वसाधारण प्रवर्गातून विशाल सदाशिव शेडगे हा उमेदवार पात्र ठरला अहे. यासोबत दोन उमेदवारांची प्रतीक्षा यादी जोडली आहे. तर खुल्या महिला प्रवर्गातून नम्रता राजेश रणसिंग यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. मात्र, प्रतीक्षा यादीकरिता उमेदवार उपलब्ध होत नसल्याने एकूण गुणांच्या 45 टक्के गुण मिळविलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलविण्यात येणार आहे.