पिंपरी – शहरातील नागरिकांना आता घराजवळच उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात ७९ आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येणार आहेत.
मोठ्या रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी शहरात आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेला भाग, झोपडपट्टी, चाळी, एक किलो मीटर अंतरावर महापालिका रुग्णालय, दवाखाना उपलब्ध नाही, अशा २५ ठिकाणी ‘जिजाऊ क्लिनिक’ सुरू करण्याचे नियोजन केले होते. यामधील दापोडी, काळेवाडी, रावेत आणि दिघी या चार ठिकाणी क्लिनिकचे काम अंतिम टप्प्यात आहे. या क्लिनिकचे काम पूर्ण होताच हे आरोग्यवर्धिनी केंद्रात समायोजन करण्यात येणार आहे.
एका आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना तीन कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या वतीनेही मदत मिळणार आहे. नागरिकांना घराजवळच प्राथमिक उपचार मिळाल्याने रुग्णालयावरील ताण कमी होईल. गरजूंना लवकर उपचार देणे शक्य होईल. शासनामार्फत आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पुरविणे शक्य होईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.