सातारा – साताऱ्यातील वाढते अपघात, तरुणाईची हुलजबाजी, कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटना यामुळे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजेंद्र चोरगे यांच्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने जागल्याची भूमिका घेतली आहे . हॉटेल्स, ढाबे, पान टपऱ्या यांना वेळेचे बंधन, घाटातील रस्त्यावर पोलिसांची पेट्रोलिंग, अल्पवयीन चालकांवर कठोर कारवाई, आणि वाहतूक नियंत्रणाची वाढती वेळ अशा विविध मुद्द्यांवर चोरगे यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना चार पत्रे पाठवली आहेत
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने सातारकरांना शांत जीवन व्यतित करता यावे याकरिता ठोस भूमिका सातारा जिल्हा पोलिसांनी घ्यावी अशी मागणी केली असून तशी पत्र त्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना पाठवली आहेत. सातारा शहरातील वाहतूक कोंडी, टपऱ्यांवर अवैध धंदे मादक पदार्थांची विक्री, अतिक्रमणे, तरुणाईचे वाढते अपघात यामुळे सातारकरांमध्ये चलबिचल सुरू आहे.
त्याकरिता काही ठोस उपाय योजना राबवाव्या लागतील, अशी अपेक्षा चोरगे यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या पत्रामध्ये चोरगे यांनी सातारा शहर आणि परिसरातील हॉटेल पान टपऱ्या या रात्री उशिरापर्यंत सुरू असतात त्यामुळे अनेक समाजविघातक कारवायांना उत्तेजन मिळते त्याकरिता हॉटेल ढाबे यांना वेळेचे बंधन निर्धारित करून देण्यात यावे आणि रात्रीच्या वेळी निघणाऱ्या सुसाट बायकर्सवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चोरगे यांनी केली आहे .
सहज उपलब्ध होणारी मादक द्रव्य आणि नशा निर्माण करणाऱ्या घटकामुळे तरुणाई नशेच्या आहारी गेली आहे. गुटख्यासह इतर पदार्थामुळे तरुणाई कॅन्सरच्या विळख्यात अडकत आहे. चार भिंत, अजिंक्यतारा, यवतेश्वर घाट, परिसरात युवकांची टोळकी भटकत असतात. या टोळ्क्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. याशिवाय मादक पदार्थ विकणाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी, असे चोरगे यांचे म्हणणे आहे. शहरातील विविध महाविद्यालय व शाळा परिसरात अल्पवयीन मध्ये दुचाकी घेऊन फिरत असतात.
त्यामुळे अनेकदा अपघात घडतात, हे टाळण्यासाठी अल्पवयीन चालकासह त्याच्या पालकांवर कायद्यानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे. वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकींसह पार्किंगची समस्या भेडसावत आहे. शहरासह विस्तारित भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बहुतांश नियंत्रण आणि वाहतूक सुरळीत करण्यावरच वाहतूक कर्मचाऱ्यांचा वेळ खर्च होतो. ज्यादा वाहतूक कर्मचारी नेमणे आणि वाहतूक नियंत्रणाची वेळ वाढवणे, अशी मागणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आल्या आहेत.