दिलासादायक स्थिती : रुग्णसंख्या घटत असतानाच बरे होण्याचे प्रमाणही वाढतेय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या सात महिन्यांपासून ठान मांडून बसलेल्या करोनाने आतापर्यंत 81942 नागरिकांना बाधित केले आहे. हा आकडा देशाच्या एकूण करोनाबाधितांच्या 1.21 टक्के इतका आहे. असे असले तरी शहरात करोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. आतापर्यंतच्या एकूण बाधितांपैकी 92.80 टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात रिकव्हरीची टक्केवारी 85 टक्के आहे तर शहरात त्याहून सात टक्के अधिक रिकव्हरी रेट आहे.
मार्च महिन्याच्या मध्यात करोनाने पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश केला होता. मार्च, एप्रिल, मे आणि जून या लॉकडाऊनच्या महिन्यांमध्ये शहरातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. परंतु टाळेबंदीचे निर्बंध शिथील होताच करोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढू लागला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये करोनाचा उद्रेक पहावयास मिळाला. सप्टेंबरमध्ये रोज एक हजाराहून अधिक बाधित आढळत होते.
प्रशासन आणि सरकारच्या उपाययोजना, डॉक्टर व वैद्यकीय स्टाफचे अथक परिश्रम आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे मृत्यूदर आटोक्यात ठेवण्यात यश आले. सध्या 1.70 टक्के इतका मृत्यूदर असून तो अजून कमी करण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत.
विशेषतः महापालिकेची रुग्णालये, कोविड केयर सेंटर यांनी रुग्ण बरे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे एकूण करोनाबाधितांचा आकडा 81942 दिसत असला तरी त्यापैकी 76050 जण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. सध्या महापालिकेच्या रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये 2826 आणि शहराबाहेरील 570 रुग्ण उपचार घेत आहेत.
बाहेरील रुग्णांसाठी ठरले वरदान
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेरील करोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने शहरात उपचारासाठी दाखल झाले. यापैकी बहुतेक रुग्ण हे ग्रामीण भागातील होते. ते प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झाले होते. तरीदेखील महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफने शर्थीचे प्रयत्न करत 5417 जणांना करोनामुक्त केले. अद्यापही शहराबाहेरील 418 रुग्ण उपचार घेत आहेत. दुर्दैवाने बाहेरील 537 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.