पिंपरी – कोरड्या हवामानामुळे सध्याची उष्णतेत वाढ झाली आहे. परिणामी मंगळवारी चिंचवडचे तापमान 34 अंश नोंदविले गेले. तर, हिंद महासागरावर अल निनोचा प्रवाह त्याच्या सक्रिय टप्प्यात आहे आणि मार्चपर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे. तसेच सध्याच्या तापमानावर अल निनोचा प्रभाव असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शहरात सध्या ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवत आहे. सरासरीपेक्षा कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. 34 ते 35 अंशावर पारा आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरात कमाल तापमानात वाढ झाली असून ही स्थिती पुढील आठवडाभरही कायम राहण्याची अपेक्षा आहे.
सोमवारी चिंचवडचे तापमान 34 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. तर, शनिवारी (दि. 7) 35 अंश होते. जे सामान्यपेक्षा जास्त होते. उन्हाळ्यासारखे वातावरण असल्याने दिवसाही पंखे लावावे लागत आहेत. तापमानवाढीमुळे दिवसा घराबाहेर पडताना काळजी घ्यावी लागत असून शहरात गेल्या दोन – तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.
सध्या, पावसाचे कोणतेही संकेत नाहीत आणि कोरडे हवामान अपेक्षित आहे. परिणामी, नागरिकांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. रविवारपर्यंत शहर आणि परिसरात कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.