पिंपरी – पिंपरी ते पुणे अशी मेट्रो धावण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मेट्रोचा प्रकल्प सुरू झाल्यापासून शहरातील नागरिकांची मागणी होती की मेट्रो सेवा निगडीपर्यंत असावी. शहरातील मेट्रोचे अंतर खूपच कमी असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करत मेट्रोचा निगडीपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी केली होती. राज्य सरकारकडून याला मान्यता मिळाली होती परंतु केंद्राकडून मान्यता न मिळाल्याने मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचे हालचाली थंडावल्या होत्या. अखेर आता मेट्रो निगडीपर्यंत जाणार असून त्यासाठी केंद्राकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याच्या मार्गाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. त्या बाबत मेट्रोचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राकडे प्राप्त झाला आहे. येत्या सात दिवसांच्या आत मान्यता देण्याचे आश्वासन केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले असल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. राज्य शासनाने निगडीपर्यंतच्या मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी खासदार बारणे यांनी गुरुवारी (दि. 3) संसद भवनात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली. निगडीपर्यंतच्या मेट्रोला मान्यता देण्याची विनंती केली. त्यावेळी हे आश्वासन दिले.
आकुर्डी, चिंचवड आणि निगडी परिसरातील नागरिकांची निगडीपर्यंत मेट्रो सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत 25 फेब्रुवारी 2022 रोजी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाला 910.18 कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चासह सुधारित तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्यात आला आहे.
वाढणार तीन स्थानके
पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके असतील. या विस्तारित मार्गासाठी होणाऱ्या खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. हा प्रस्तावित कॉरिडॉर 4.13 किमी लांबीचा असून तो एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून बांधला जाईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च 910.18 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला तत्काळ मान्यता दिल्यास पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंतचा विस्तार विहित मुदतीत पूर्ण होईल.
वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प आवश्यक आहे. यामुळे मेट्रोला निगडीपर्यंत नेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत सातत्याने चर्चा सुरू आहे. येत्या सात दिवसांमध्ये राज्य सरकारच्या प्रस्तावाला मान्यता मिळेल.
– श्रीरंग बारणे, खासदार, मावळ