पुणे – महापालिकेकडून “स्कूल प्रायोरिटी झोन गाइडलाइन्स’ तयार करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या पथ विभागाकडून हा प्रकल्प हाती घेण्यात असून असा प्रकल्प राबविणारी पुणे ही पहिली महापालिका ठरली आहे. पालिकेकडून शाळा वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्यात येत असून त्याअंतर्गत ही नियमावली तयार करण्यात आली आहे. यासाठी शहरातील शाळांचे 20 विभाग करण्यात आले असून प्रत्येक विभागात नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार आहे. मार्गदर्शक सूचनांच्या पुस्तिकेचे प्रकाशन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते होत आहे.
काय आहे उद्देश…
शाळेपर्यंत पोहचताना विद्यार्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेत शाळेपर्यंत येणारे एक किलोमीटरच्या परिसरातील रस्त्यांवर या मार्गदर्शक सूचनांचा वापर करून रस्त्यांची रचना, विद्यार्थांची सोय, त्यांना सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा, शाळांच्या आवारात वेगवेगळ्या प्रकारचे माहिती फलक, लहान मुलांना रस्ता ओलांडण्यासह, सुरक्षित पदपथ अशा प्रकारच्या सुविधांसाठी मार्गदर्शक सूचना असणार आहेत.
20 झोनची निर्मिती..
शहरातील शाळांच्या ठिकणांनुसार महापालिकेने 20 झोन तयार केले आहेत. त्यापूर्वी महापालिकेने शहरात 3 विभाग करून 9 शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजवाई केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने प्रत्येक झोन मधील शाळांसाठी या मार्गदर्शक सूचनांनुसार, मुलांना सुविधा दिल्या जाणार आहेत. या झोनमध्ये येरवडा, बालेवाडी, पंचमी चौक, खराडी, डेक्कन, विश्रांतवाडी, हडपसर, नारायणपेठ, वडगावशेरी, कोथरूड, वानवडी, आंबेगाव, जहांगीर हॉस्पिटल, सदशिव पेठ, बाणेर, औंध, चतृशृंगी रस्ता, वारजे, कर्वे रस्ता या विभागांचा समावेश आहे.