पिंपरी – सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वारे वाहत आहे. त्यामुळे बाजारपेठांच्या परिसरात नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, त्याच परिसरात मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्येच बसत असून त्यांना ओलांडून जाताना वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने कार्यवाही करण्याची गरज आहे. मात्र, ते नुसतीच बघ्याची भूमिका घेत असल्याचा वाहनचालकांचा आरोप आहे.
सध्या नागरिकांची साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांच्या परिसरात गर्दी होत आहे. सुटीचे औचित्य साधत तसेच पावसाचे वातावरण पहात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. नागरिकांच्या गर्दीतच रस्त्याच्या अगदी मध्येच मोकाट जनावरे बसलेली असतात. मध्येच ती उठून धावतात. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडते. त्यातून अपघाताच्या घटना घडत आहेत. तसेच वाहतूक कोंडीतही मोठी भर पडते. या मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्याची गरज आहे. मात्र, महापालिकेचा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांच्या आहेत.
प्रामुख्याने पिंपरी बाजारपेठेच्या परिसरात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात दिसतात. येथे जवळच भाजी मंडई आहे. विक्रेत्यांनी टाकलेला शिल्लक भाजीपाला खाण्यासाठी ही जनावरे या परिसरात वावरत असतात. तर, येथेच कापड, किराणा व इतर साहित्यांची बाजारपेठ आहे. शहरातील ही मोठी बाजारपेठ व होलसेल विक्रीचे केंद्र असल्याने या परिसरात शहर, उपनगरांमधून खरेदीसाठी नागरिक येतात. मात्र, रस्त्याच्या मध्येच मोकाट जनावरे बसलेली असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने सण-उत्सवाच्या काळात तरी या जनावरांचा बंदोबस्त करावा, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.