पिंपरी – शहरातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते, घनकचरा, हरितक्षेत्र, उद्यान विकास संवर्धन अशा अनेक सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. या सर्व सुविधांचे व्यवस्थापन करताना त्याचा शहराच्या पर्यावरणावर आणि नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम होत असतो. त्या दृष्टीने पर्यावरण अहवाल महत्वपुर्ण आहे. शहराच्या शाश्वत, पर्यावरणपुरक विकासासाठी पर्यावरण अहवाल दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येणारे विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा व त्यांचे शहराच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचे मुल्यांकन करणारा सन 2022-23 चा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल आयुक्त तथा प्रशासक सिंह यांच्याकडे मंगळवारी (दि.25) सादर करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते.
पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, पर्यावरण सद्यस्थिती अहवाल स्कायलॅब या संस्थेने पालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी केलेल्या वायू, ध्वनी, पाणी इत्यादी चाचण्यांच्या निकषांवर पर्यावरण सद्यस्थिती अहवाल आधारित आहे. सिस्टीमवरचा वाढता ताणाचाही यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे.
तिन्ही नद्यांचे प्रदूषण वाढले
2021-22 मध्ये शहरात करोनामुळे श्वसन संस्थेच्या आजाराच्या रुग्णसंख्येत तसेच डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शहरातील नद्यांच्या पाण्याची रासायनिक तपासणीची आकडेवारी या अहवालात नमूद करण्यात आली आहे. नदीमध्ये जाणारे सांडपाणी, निर्माल्य, कपडे, धुणे अशा विविध गोष्टींमुळे पाण्याची गुणवत्ता ढासळते. मुळा नदी ही पवना व इंद्रायणी नदीच्या तुलनेत कमी प्रदुषित दिसून येते. पवना नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असल्याने अधिकांश नाले या नदीत मिसळतात तर इंद्रायणी नदी औद्योगिक क्षेत्रातून वाहत असल्याने या नद्या प्रदुषित होत असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे. महापालिकेने पर्यावरणपूरक राबविलेले उपक्रम, शासनाकडून मिळालेली निधी, विविध पारितोषिके याचा उहापोह अहवालात करण्यात आला आहे.
पिंपरी ः 2022-23 चा पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे पर्यावरण विभागाने सादर केला. यावेळी डावीकडून शहर अभियंता मकरंद निकम, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आयुक्त सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे.