जाधववाडी – खंडेनवमीपासून उद्योगनगरीत पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टेम्पो व इतर वाहनांमधून झेंडूची फुले विक्रीसाठी आणली होती. पिंपरी चिंचवडची ओळख उद्योगनगरी अशी आहे. येथे अनेक लहान मोठे उद्योग असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक व कामगार येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूची फुले विक्रीसाठी आणली होती. परंतु फुलांची आवक वाढली आणि दर घसरल्याने मोठ्या प्रमाणावर व्यापारी व शेतकऱ्यांनी फुले रस्त्यावर, पदपथावर तसेच मोकळ्या जागेत टाकून गेली आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील के. एस. बी. चौक, स्पाइन रोड, कृष्णानगर चौक, जाधववाडी, चिंचवड एमआयडीसी रोड, थरमॅक्स चौक आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांसह शेतकरी फुलांची दुकाने थाटून बसलेली होती. खंडेनवमीच्या दिवशी झेंडूला चांगला भाव मिळाला. परंतु दसरा आणि खंडेनवमीच्या सायंकाळी मात्र झेंडू शंभरला तीन किलो दराने विक्री करण्यात आला. परंतु झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बहुतांश शेतकरी व व्यापाऱ्यांना फुले फेकून देण्याची वेळ आली. ज्यांनी ज्यांनी दुकाने थाटली विशेषतः सातारा, कराड, नगर, सांगली, सोलापूर, बार्शी या भागातून अनेक शेतकरी फुलविक्रीकरिता आले होते.
मावळ परिसरातून व काही स्थानिक व्यापाऱ्यांकडून शहरभरात फुलविक्री करण्यात आली. परंतु आपला व्यवसाय करताना आपण जेथे बसून व्यवसाय करत आहोत तेथे राडारोडा न टाकता जागा साफ करून जावे अशी कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे होते. परंतु फुलांची मागणी घटली आणि भाव मिळत नसल्याने वैतागून बऱ्याच शेतकऱ्यांनी पदपथावर, रस्त्यावर फुलांचे घातलेले ढीग तसेच सोडून घरी जाणे पसंद केले.
फुल मार्केटमध्ये मिळाना भाव
सोलापूर, नगर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातून गूलटेकडी व शहरातील महत्त्वाच्या फुलबाजारात शेतकऱ्यांनी झेंडूची फुले विक्रीसाठी आणली. अष्टमीच्या व नवमीच्या दिवशी साधारण फुलांना 30 ते 40 रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. परंतु पुन्हा आवक वाढल्याने 5 ते 10 रुपये किलोप्रमाणे देखील दर मिळत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावून स्वतः फुलांची विक्री केली. तर काहींनी आपल्या जवळच्या पाहुण्यांशी संपर्क साधून रस्त्यावर पदपथावर दुकाने थाटली. परंतु आवक जास्त झाल्याने सर्वच रस्ते पिवळे आणि लाल फुलांनी थटून गेले. परंतु शेतकऱ्यांचे जीवन फुलांना भाव न मिळाल्याने करपून गेल्याची भावना विक्रेत्यांनी व्यक्त केली.
आरोग्य विभागाने केले रस्ते साफ
नवमी आणि दसरा या दिवशी शहरातील बहुतांश रस्त्यांवर शेतकऱ्यांनी व व्यावसायिकांनी फुलविक्रीचा व्यवसाय सुरू केला. परंतु खंडेनवमीच्या रात्री दहा अकरापर्यंत फुलांची विक्री होताना दिसत नसल्याने लांबच्या शेतकऱ्यांनी रातोरात 30 ते 40 रुपये किलोने फुलांची विक्री करून राहिलेला माल तसाच सोडून गाव घाटला. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाला मात्र शहरातील सर्व रस्त्यांची साफसफाई करण्याचे काम हाती घ्यावे लागले. नियोजनशून्य कारभारामुळे स्थानिक यंत्रणेवर स्वाभाविकच ताण आला.