पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) -राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्या जुन्या पेन्शनसाठी अर्थात सेवानिवृत्ती वेतनासाठी पात्र कर्मचाऱ्यांना जिवंत असलेला पुरावा म्हणून जीवन प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाइफ सर्टीफिकेट (डीजेएल) सरकारकडे सादर करावे लागते. ही सुविधा शहरातील 114 पोस्टमन देणार असून चिंचवड ईस्ट येथेही सुविधा उपलब्ध असणार आहे.
सेवानिवृत्ती वेतनासाठी वर्षातून एकदा हे प्रमाणपत्र प्रत्येक केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावे लागते. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात येते. या कालावधीत संबंधितांना हे प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्या शिवाय सेवानिवृत्ती वेतन मिळू शकत नाही. विशेष म्हणजे पोस्टाचे कर्मचारी घरी येऊन सेवानिवृत कर्मचाऱ्यांना या सेवेचा लाभ देऊ शकतात.
गेल्या काही वर्षांत हे प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्याने लाभधारकांची चांगली सोय झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोठूनही हे प्रमाणपत्र देता येते. पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड ईस्ट टपाल कार्यालयात मोफत सुविधा आहे. तर, घरी पोस्टमन येऊन ही सुविधा देणार असतील तर त्यासाठी 70 रुपये मोजावे लागतील.