पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात कॉंग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्त्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात एक व्यक्ती एक पद हा नियम का लागू केला जात नाही? हा प्रश्न विचारणारे पत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शहरातील जुन्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र पाठवून शहर नेतृत्त्वावर प्रश्न निर्माण केले आहेत. या पत्रावर अनेकांच्या सह्या असून यापैकी काही पदाधिकाऱ्यांनी याची पुष्टी देखील केली आहे.
विद्यमान शहराध्यक्ष कैलास कदम यांच्याकडे इंटकचे पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव हे पद आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षात एक व्यक्ती एक पद असा ठराव होऊनही शहराध्यक्ष कदम यांच्या बाबतीत या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही? शहर नेतृत्वावरही कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. कदम यांना महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या नेत्यांचा आर्शीवाद आणि पाठिंबा आहे का? असे म्हणत एक व्यक्ती एक पद सूत्राचा कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी निर्णय घ्यावा, अशी लेखी पत्राव्दारे मागणी केली आहे.
राष्ट्रीय कॉंग्रेसचे दि. 14 ते दि. 16 मे 2022 या कालावधीत राजस्थानमधील उदयपूरमध्ये शिबिर झाले. या शिबिराला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह सुमारे चारशेपेक्षा जास्त नेत्यांची उपस्थिती होती. याच शिबिरात कॉंग्रेस पक्षात एक व्यक्ती एक पद असा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. या शिबिरात झालेल्या ठरावाचा पक्षाला विसर पडल्याचे दिसून येऊ लागले आहे.
कॉंग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर कामगार नेते कैलास कदम यांची 7 ऑक्टोबर 2021 रोजी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कदम यांची नियुक्ती होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. कदम यांच्याकडे इंटकचे पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव हे पद आहे. मात्र, कॉंग्रेसच्या धोरणानुसार एक व्यक्ती एक पद असा ठराव असतानाही त्यांच्याकडे दोन पदे असल्याबाबत शहरातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी नुकतेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लेखी पत्र पाठवून आपली नाराजी प्रकट केली आहे. या पत्रावर शहर कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पांढारकर, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, राजाभाऊ गोलांडे, सुंदर कांबळे, दत्तू दातीर-पाटील, संदेश नवले, आबा खराडे, बाळासाहेब साळुंखे, मकरध्वज यादव, शितल कोतवाल, प्रतिभा कांबळे, राजेंद्र काळभोर, राहुल राऊत आदींची नावे आहेत. यापैकी काही नेत्यांना फोन केला असता त्यांनी आपण या पत्रावर सही केली असल्याची पुष्टी दिली आहे.
शहराध्यक्षांकडून प्रतिसाद नाही…
गेल्या काही दिवसांपासून शहर कॉंग्रेसमध्ये एक प्रकारची मरगळ आलेली दिसून येत आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये एकही नगरसेवक निवडून न आणता आलेल्या या राष्ट्रीय पक्षामध्ये स्थानिक पातळीवर मात्र अंतर्गत कलह आहे. कलह आणि नाराजी दूर करण्यात शहराध्यक्षांना अपशय आल्याचे यातून दिसून येत आहे. या पत्राबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी शहराध्यक्ष कदम यांच्याशी वारंवार संपर्क केला, मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
वरिष्ठ लक्ष घालणार का?
एकेकाळी पिंपरी-चिंचवड कॉंग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, कै. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर शहरात कॉंग्रेसला उतरती कळा लागली आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसने 66 उमेदवार देऊनही भोपळा मिळाला. शहरात कॉंग्रेसची पुरती वाताहत झाली असताना महाराष्ट्र प्रदेशचे वरिष्ठ पदाधिकारी लक्ष घालत नसल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तरी प्रदेश पातळीवरील नेते लक्ष घालणार का? हा खरा प्रश्न आहे.