- शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण वेगात – पालिकेच्या तिजोरीत कराची भर पडणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नोंद नसलेल्या निवासी, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळे भूखंड व इतर असे सर्व मिळकतींचे सर्वेक्षण नुकतेच सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आठ दिवसांत 1 हजारांपेक्षा अधिक नव्या मिळकतींचा शोध लागला आहे. या नव्या मिळकतींना नव्या कर दरानुसार मिळकतकर लागू केला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हे सर्वेक्षण ऑरिनप्रो सोल्युशन या खासगी एजन्सीमार्फत गुरुवार (दि. 5) पासून सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षण जीआयएस टॅगिंग (जिओग्रॉफीक इन्फॉर्मेशन सिस्टीम) आणि ड्रोनच्या माध्यमातून केले जात आहे. त्याची सुरुवात थेरगाव व सांगवी भागातून केली आहे. केवळ आठ दिवसांत 1 हजारापेक्षा अधिक नव्या मिळकतींचा शोध लागला आहे.
टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात पथके लावून सर्वेक्षण केले जाणार आहे. ड्रोन, जीआयएस टॅगिंग, गूगल मॅपिंग तसेच, कर संकलन विभाग व इतर विभागांची मदत घेऊन नव्या व नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेतला जात आहे. मिळकतीचे प्रत्यक्ष मोजमाप घेऊन निवासी व बिगरनिवासी चालू दरानुसार मिळकतकराची आकारणी केली जात आहे. कच्चा बिलाद्वारे कर संकलन विभाग संबंधित मिळकतधारकास नोटीस बजाविणार आहे. मिळकतधारकांना तो वाढीव कर भरावा लागणार आहे अन्यथा मागील 6 वर्षांचा कर वसूल केला जाणार आहे.
दरम्यान, शहरातील 5 लाख 30 हजार 787 मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. त्यामध्ये निवासी मिळकती 4 लाख 50 हजार 168, बिगरनिवासी मिळकती 49 हजार 676, औद्योगिक मिळकती 3 हजार 702, मोकळे भूखंड 8 हजार 838, मिश्र मिळकती 15 हजार 848 आणि इतर मिळकती 5 हजार 222 आहेत. अनेक नवी बांधकामे, इमारती, पत्राशेड, गाळे यांची महापालिकेकडे नोंद केली जात नाही. तसेच, वाढीव बांधकाम आणि निवासी बांधकामांचे बिगरनिवासी वापर यांची नोंद करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यातून महापालिकेचा दरवर्षी कोट्यवधींचा मिळकतकर बुडतो. ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण करून नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे.
तीन महिने सर्वेक्षण सुरू राहणार
ऑरिनप्रो सोल्युशन या एजन्सीकडे 2016 व 2019 असे 2 वर्षांचे गूगल मॅप आहेत. त्यानुसार नवे बांधकाम, वाढीव बांधकाम, निवासीचे बिगरनिवासीसाठी वापर अशा मिळकतींची तपासणी केली जात आहे. त्या कामासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 3 महिने चालणार आहे.
दिवसेंदिवस पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार होत आहे. या शहरात राहण्यास नागरिकांची पसंती आहे. त्यामुळे शहराच्या चारी बाजूस नागरीकरण वाढत आहे. परिणामी, सर्वत्र गृहप्रकल्प, इमारती व बांधकामे होत आहेत. नव्या मिळकतींची नोंद अनेकदा केली जात नाही. त्यामुळे महापालिकेचा मिळकतकर बुडत आहे. अशा मिळकतींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये 50 हजारांपेक्षा अधिक नव्या मिळकतींचा शोध लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी कोट्यवधींची भर पडेल.
– स्मिता झगडे, उपायुक्त, कर संकलन विभाग