पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मार्च महिन्यांपासून या रुग्णालयात 1 हजार 329 महिलांची प्रसुती झाली. यापैकी 11 करोनाबाधित महिलांच्या नवजात अर्भकांनाही करोनाची लागण झाली होती. या अकराही नवजात शिशुंनी करोनावर यशस्वी मात केली आहे. ‘वायसीएम’मधील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने व योग्य उपचाराने या बालकांना जीवनदान मिळाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर वायसीएम रुग्णालय हे कोविड समर्पित केले होते. त्यामुळे महिलांच्या प्रसुतीसाठी समस्या निर्माण झाल्या होत्या. अनेक रुग्णालयांमध्ये महिलांना प्रसुतीसाठी नकार देत असल्याने एप्रिल महिन्यांपासून पुन्हा प्रसुती विभाग सुरू करण्यात आला. यामध्ये करोना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या महिलांची प्रसुती करण्यात आली. “वायसीएम’मध्ये गेल्या सात महिन्यांत 1 हजार 329 महिलांची प्रसुती झाली. यामध्ये 255 महिला करोनाबाधित होत्या. या महिलांनी जन्म दिलेल्या बाळांपैकी 11 बाळांना करोनाची लागण झाली होती. या अर्भकांवर बालरोग विभागात यशस्वी उपचार करण्यात आले.
बाळाच्या जन्मानंतर त्याला आईचे दूध पाजणे महत्त्वाचे असते. त्याने प्रतिकारशक्ती वाढत असल्याने प्रत्येक बाळाला आईचे दूध दिले जात होते. उपचारानंतर सर्व बालके ठणठणीत बरी झाली आहेत. या बालकांना घरी सोडल्यानंतर त्यांची आई-वडिलांकडे त्यांच्या प्रकृतीविषयी फोनद्वारे विचारपूस केली जात आहे.
वायसीएम रुग्णालयामध्ये जन्मलेल्या प्रत्येक अर्भकाची पहिल्या एका तासामध्ये करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये अकरा अर्भके करोनाबाधित निघाली. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयातील बालरोग विभागात यशस्वी उपचार करण्यात आले. उपचारासाठी रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय, आया या सर्वांनीच खूप कष्ट घेतले. योग्य उपचारामुळे बालके लवकर बरी झाली. बाधित आलेली सर्व बालके आता ठणठणीत आहेत.
– डॉ. दीपाली अंबिके, बालरोगतज्ज्ञ वायसीएम.