पिंपरी – पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांना नियमित तिकीट दरात एसी बसचा प्रवास उपलब्ध करून दिला आहे. मात्र, अनेक बसमध्ये झुरळांचा प्रादुर्भाव झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे या बसमधून होणारा गारेगार प्रवास प्रवाशांकरिता त्रासदायक ठरत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपी बसचे संचलन होत आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व अधिक आरामदायी होण्याकरिता पीएमपीच्या ताफ्यात अनेक एसी बसचा समावेश करण्यात आला आहे. विशेषत: उन्हाळ्यात प्रवाशांची या बसला अधिक पसंती असते. मात्र, आता बसमधून प्रवास करताना नागरिकांना हा प्रवास त्रासदायक ठरत आहे. पीएमपीच्या ताफ्यामधील अनेक बसमध्ये झुरळे फिरत असल्याचे दृश्य दिसत आहे.
मुख्य बसथांब्याला काही मिनिटांकरिता बस विश्रांतीकरिता थांबल्यानंतर या झुरळांचा आसन व प्रवाशांचा अंगावर मुक्त वावर असल्याचे पहायला मिळत आहे. काही ठराविक बसमध्ये झुरळांचा प्रादूर्भाव झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता बसमध्ये पेस्ट कंट्रोल करण्याची प्रवासी मागणी करत आहेत.