- केवळ 957 रुग्ण उपचाराधीन रुग्ण; मृत्युचा आकडाही घटला
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये दिलासादायक चित्र निर्माण झाल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याची सुरूवातही सकारात्मक झाली आहे. दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या चार अंकीवरून आता दोन अंकापर्यंत घसाली आहे. रुग्णांची संख्या कमी येत असल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे.
त्यामुळे वैद्यकिय यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. सद्यस्थितीत शहरात 957 रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सुमारे 60 टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. मागील पाच महिन्यांच्या तुलनेमध्ये शहरातील रुग्ण व मृतांची संख्या कमी झाली असून शहराची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत आहे. शहरामध्ये दररोज बाधित रुग्णांपेक्षा डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे आतापर्यंत शहरातील 85 हजारांहून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला राहिला. शहरासाठी ऑक्टोबर महिना दिलासादायक ठरला आहे. शहरात 1 ऑक्टोबरपर्यंत 78 हजार 714 जणांना करोनाची लागण झाली होती. तर त्यादिवशी 633 नवीन करोनाबाधित आढळले होते. शहरामध्ये 28 सप्टेंबरला रुग्णसंख्येत मोठी घट झाली. यादिवशी शहरामध्ये 554 रुग्णांची नोंद झाली.
सप्टेंबर महिन्यात सुमारे 28 हजार नवीन रुग्णांची भर पडली होती. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये करोनाचा आलेख झपाट्याने खाली आला. ऑक्टोबर महिन्यामध्ये शहरात 9 हजार 169 रुग्णांची नोंद झाली. तर 13 हजार 467 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याची सुरूवात ही दिलासादायक झाली आहे. या महिन्याच्या सात दिवसांमध्ये करोनारुग्णांची संख्या 795 इतकी आली आहे. तर 783 रुग्ण बरे झाले आहेत. सात दिवसांत बरे होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा कमी आहे. मात्र असे असले तरी पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच रोजची बाधितांची संख्या शंभरपेक्षा कमी झाली आहे. शनिवारी शहरात 97 बाधितांची नोंद झाली.
सद्यस्थितीत शहरामध्ये 96.27 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर अवघ्या 1.79 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच आतापर्यंत एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1.74 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मृत्यूदर 2 पेक्षा जास्त होऊ न देण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे.
करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना शोधणे मोठे आव्हान होते. त्यासाठी प्रशासाने जास्तीतजास्त तपासणी करण्यावर भर दिला. आजपर्यंत शहरामध्ये चार लाख 17 हजार नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये 78.78 टक्के नागरिक निगेटिव्ह आले आहेत. शहरात आतापर्यंत 88 हजार 678 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 183 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहराबाहेरील 639 रुग्णांचा समावेश आहे.
85 हजाराहून अधिक रुग्ण बरे
शहरामध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत 88 हजार 678 रुग्णांची नोंद झाली होती. तर 85 हजार 374 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत 14,250 रुग्ण बरे झाले आहेत. तर 9,964 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.