चिखली – साने चौकाजवळील भाजी मंडई परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, फळभाज्या तसेच इतर साहित्य विक्री करणार्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने रस्ता वाहतुकीसाठी अडथळा ठरत होता. त्यामुळे फ क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करत येथील रस्ता वाहतुकीस मोकळा केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रभागांमधील चौक व महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांत अतिक्रमण विरोधी पथक नियुक्त केले आहे. या पथकाने मागील आठवड्यापासून फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या प्रभागातील साने चौक व देहू आळंदी मार्गावरील अनधिकृत हातगाड्या व पथारी व्यावसायिकांवर कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे.
साने चौकाजवळील भाजी मंडई परिसरात वाहनांना व नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा रस्ता आहे. परंतु या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते, भाजीपाला, सणावाराचे साहित्यविक्री करणारे तसेच नर्सरीमधील झाडांची विक्री करणारे व्यावसायिक आणि स्थानिक व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने दुचाकी व चारचाकी वाहने तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे फ क्षेत्रीय कार्यालयाकडे नागरिकांनी तक्रार केल्यानंतर ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांनी अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करत साने चौक, भाजी मंडई परिसर आणि देहू-आळंदी मार्गावरील अनधिकृत पथारी व हातगाड्यांवर कारवाई केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
स्पाइन रोडला हॉकर्स झोन
साने चौक, भाजी मंडई परिसरातील हातगाडी, पथारी व्यावसायिकांसाठी फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने भाजी मंडई चौकात स्पाइन रोडच्या अंतर्गत भागात सिमेंटचे वटे व लाइटची व्यवस्था करून हॉकर्स झोन तयार करून दिला आहे. व्यावसायिकांनी त्याठिकाणी आपला व्यवसाय करावा. त्यामुळे रहदारीच्या चिखली-आकुर्डी मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही.
आठ दिवसांपासून फ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करत साने चौक आणि देहू-आळंदी मार्गावरील साधारण 30 ते 35 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच धडक कारवाई पथक परिसरात तळ ठोकून राहत असल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
– सीताराम बहुरे, ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी.
रस्ते वाहतूक सुरळीत होण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथकाने गोरगरीब भाजी, फळविक्रेत्यांच्या गाड्यांवर कारवाई केली आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी हातगाडी, पथारीवाल्यांना हॉकर्स झोन निर्माण करून द्यावेत. तसेच व्यावसायिकांनी देखील वाहतुकीस अडथळा ठरेल असे अतिक्रमण करू नये.
– जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते, चिखली.