पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी होळी तर मंगळवारी धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावठाण परिसर आणि सोसायट्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन करण्यात आले. सोमवारी सायंकाळी ठिक-ठिकाणी होळीचे पूजन करण्यात आले. गोवऱ्या रचून, त्यावर एरंडीचा डहाळी लावून, सभोवती सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. त्यानंतर होळीचे पूजन करून, ती पेटविण्यात आली. तसेच होळीमध्ये श्रीफळ अर्पण करत होळी उत्साहात साजरी करण्यात आली. होळीचे पूजन करुन त्या भोवती प्रदक्षिणा घालून श्रीफळ अर्पण करण्यात आले.
उपनगरांमध्येही होळीचा उत्साह होता. अनेक ठिकाणी सार्वजनिक होळीचे दहन करण्यात आले. पिंपरी, चिंचवड सह अनेक ठिकाणी सार्वजनिक होळी साजरी करण्यात आली.
पावसाची हजेरी
होळीच्या दिवशी दुपारनंतरच आकाशात ढग दाटून आले होते. त्यामुळे अनेकांना होळी पूजन करता येईल, का अशी शंका होती. मात्र, काही ठिकाणी सायंकाळी तर, काही ठिकाणी रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे अनेकांनी पावसाचा अंदाज बांधत होळीचे पूजन केले.
व्यसन, दुर्गुणांची होळी
आझाद मित्र मंडळ स्पोर्टस क्लब, काळेवाडी आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार यांच्या वतीने होळीचा सण उत्साहात साजरा केला. या वेळी होळीचे पूजन करण्यात आले. होळीच्या पवित्र अग्निमध्ये विध्वंसक प्रवृत्ती नाश होवो, लोभ, द्वेष, मत्सर अहंकार नकारात्मक विचार, निराशा, व्यसन व दुर्गुणांची होळी करावी, असे मत पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम नढे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मंडळाचे सभासद राजू शिंदे, अमोल नढे, अनिल शिरसागर, सुरेश सोनवणे, खंडू आव्हाड, मंडळांचे अध्यक्ष अतुल नढे, बजरंग नढे, श्याम नढे, सुरेश सोनवणे, स्वप्नील सोनवणे, गणेश सोनवणे, वस्ताद आबा शिंदे, ज्येष्ठ नागरिक पंडित नढे, जालिंदर नढे आदी उपस्थित होते.