पिंपरी – शहरात रविवारी (दि. 12) लक्ष्मी पूजन उत्साहात पार पडले. मात्र लक्ष्मी पूजनाला शहरातील विविध भागांत फटाक्यांसह आदीमुंळे आगीच्या 17 घटना घडल्या. 12 ठिकाणी घरांना आग लागली. तीन ठिकाणी दुकानाला, एका कंपनीला तर एका झाडाला देखील आग लागली. एका दिवसात ठिकठिकाणी लागलेल्या आगीमुळे अग्निशमन विभागाची चांगलीच धावपळ झाली.
रविवारी (दि.12) सर्वत्र मोठ्या उत्साहात लक्ष्मी पूजन पार पडले. लक्ष्मी पूजनानिमित्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले. हे फटाके फोडताना काळजी न घेतल्यामुळे शहरात एकाच दिवशी आगीच्या 17 घटना घडल्या आहेत. मात्र, या आगीच्या घटनांमध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. सुदैवाने जीवित्तहानी झाली नाही.
जुनी सांगवीतील पवार नगर, पिंपळे सौदागरमध्ये पी के स्कूल जवळ, वाकडमधील सुदर्शन कॉलनी, फुगेवाडीतील सीएनजी पंपाजवळ, कासारवाडीतील सरिता गार्डन जवळ, भोसरीत पीसीएमसी चौक, चिखलीतील फोर के पॅलेस, काळेवाडीतील विजडम हायस्कूल जवळ, आकुर्डी, दत्तवाडीतील साई पूजा बाग, चिंचवडमधील एम्पायर इस्टेट, मोरवाडीतील करिश्मा हेरिटेज, दापोडी गावठाण येथील मारुती मंदिराजवळ या भागातील घरांना आग लागली. पुनावळे येथील रावेत चौक, वडमुखवाडीतील साई मंदिर जवळ, पिंपरी मार्केटमधील कपड्याच्या दुकानाला आग लागली. पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन परिसरात झाडाला तर बोऱ्हाडेवाडीत कंपनीला आग लागल्याची घडना घडली.
धावपळीचा दिवस
याचबरोबर रविवारी सकाळी 10.35 वाजता सयाजी हॉटेल समोर रस्त्यावर ऑइल सांडले होते. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत रस्त्यावरील ऑइल धुवून घेतले. दुपारी 1.25 वाजता पिंपरीतील एच ए मैदानावरील गवताला आग लागली. त्यानंतर पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम परिसरात कचऱ्याला आग लागली होती. या सर्व आगींवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले.
सकाळच्या सत्रात आगीच्या तीन घटना घडल्या. सायंकाळी सातनंतर आगीच्या 14 घटना घडल्या. आगीच्या या सर्व घटना फटाक्यामुळे घडल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून वित्तहानी झाली आहे. दिवाळीच्या पुढच्या दिवसात नागरिकांनी काळजी घेऊन फटाके फोडावेत.
– ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी