वाढत्या उष्णतेचा परिणाम; ताकाचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे
पिंपरी – चहाला वेळ नसते, मात्र वेळेला चहा हवाच असा बहुतांश जणांचा स्वभाव झाला आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे हा ट्रेंड काही प्रमाणात कमी होत असल्याचे दिसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे चहाकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. तर ताक, फळांचा रस व उसाच्या रसाला मागणी वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये ठिक-ठिकाणी थंड पेयाच्या दुकानांवर नागरिक गर्दी करत असताना दिसत आहे.
तीव्र उन्हाने चहाची जागा ताक, लस्सी या पेयांनी घेतली आहे. चहाच्या दरात ताक मिळत असून, त्याची पोषक मूल्ये ही जादा आहेत. यामुळे बाजारात चहाच्या तुलनेत ताक, लस्सीच भारी पडत आहे. शिवाय, कोल्ड्रिंक्स, लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्हे, शहाळे, फळांचे ज्युस, उसाचा रस इत्यादी पेयांचीही धूम आहे.
उन्हाची तीव्रता प्रचंड आहे. अंगाची अक्षरशः लाही लाही होत असते. त्यामुळे शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी, शरीराला गारवा मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. साहजिकच शरीराला थंडावा मिळण्यासाठी थंड पेयांची मागणी प्रचंड वाढली आहे.
विशेष म्हणजे बहुतेकांचे आवडते असणारे चहा हे पेय मागे पडले आहे. ताकामध्ये अनेक पौष्टिक घटक असल्याने ताक पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. चहामधून शरीरात पाणी कमी जाते. त्या तुलनेत मात्र, ताक हे जास्त पाणी टाकून वापरले तर ते शरीराची उन्हाळ्यात वाढलेली तहान भागवण्यासाठी उपयोगी ठरत असल्यानेही ताक पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
ताकाबद्दल आहारतज्ज्ञ सांगतात…
ताक, दह्यात भरपूर पाणी घालून बनवले जाते. दह्यामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. घरगुती नैसर्गिक पद्धतीने बनविलेल्या दह्यामध्ये आरोग्यदायी जिवाणू भरपूर प्रमाणात असतात. दह्यातील चांगल्या बॅक्टेरियामुळे व व्हिट्यामिन बी, फॉस्फरस अशा घटकांमुळे ते शरीरास अत्यंत उपयोगी ठरते. ताकामुळे जळजळ थांबून पचनशक्ती सुधारते.
दह्यापासून तयार होणाऱ्या ताकात अल्फाहायड्रोलिक आणि लॅकटिक ऍसिड असते. ज्यामुळे उन्हात त्वचेवर होणाऱ्या परिणामापासून बचाव होतो. शरीराला थंडावा मिळतो. ताकात प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, डी असल्याने रक्तदाब नियंत्रण, हृदय व हाडांच्या बळकटीसाठी उत्तम टॉनिक म्हणूनही उपयोगी ठरते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जुन ताक प्यावे, असे आहारतज्ज्ञ डॉ. विजय हतणकर यांनी सांगितले.