फलटण : पिंप्रद (ता. फलटण) येथे सिकंदर काळ्या उर्फ डिसमुख भोसले व मुलगा सुरज सिकंदर भोसले या बापलेकामध्ये झालेल्या वादावादीत बापाने मुलगा सुरज भोसले यास कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामधून मिळालेली माहिती व फिर्यादी दामिणी सुरज भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काल मंगळवार (दि. 27) एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सिकंदर काळ्या उर्फ डिसमुख भोसले यांनी पहिली बायको असताना दुसरी बायको येडाबाई हिच्याबरोबर गाठ बांधल्याने मुलगा सुरज भोसले व वडिलांच्यामध्ये वादावादी झाली. या वादावादीचे रूपांतर भांडणात झाल्यावर सिकंदर भोसले यांनी सुरज भोसले यांच्या डोक्यात व डाव्या पायावर कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर दुखापत करुन खून केला.
फिर्यादीवरून सिकंदर काळ्या उर्फ डिसमुख भोसले यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी दहिवडीचे पोलीस उपअधीक्षक डॉ. निलशस देशमुख व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.