लोणी काळभोर -पुण्यातून कदमवाकवस्ती येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी तीन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या करोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन्ही जावायांचे करोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर संबंधित महिलेवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयातील तीन डॉक्टर अशा एकूण पाच जणांचा करोना अहवाल निगेटीव्ह आल्याने, कदमवाकवस्ती येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
संबंधित महिलेच्या दोन्ही जावायांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने, आरोग्य विभागाने या जावायांच्या संपर्कात आलेल्या घरातील सर्व नातेवाइकांची करोना चाचणी करण्याचा निर्णय रद्द केला असल्याची माहिती लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली. पुण्यात लोहियानगर परिसरात राहणारी एक महिला उपचारासाठी तीन दिवसांपूर्वी फुरसुंगी फाट्यावरील एका खासगी रुग्णालयात आली होती.