नवी दिल्ली – करोनावर उपयुक्त ठरणारी लस भारताला पुरवण्याची तयारी अमेरिकेतील फार्मा सेक्टरमधील बलाढ्य कंपनी फायझरने दर्शवली आहे. येत्या काही महिन्यांत भारताला पाच कोटी डोस देण्याची त्यांची तयारी असली तरी त्यांना भारताकडून काही मुभा हव्या आहेत. जर लस घेतल्यावर कोणावर त्याचे दुष्परिणाम झाले व नुकसान भरपाईची मागणी केली गेली तर त्यापासून त्यांना कायद्याचे संरक्षण हवे आहे व हीच त्यांची प्रमुख मागणी असल्याचे समोर आले आहे.
भारतात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक या तीन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र कंपन्यांचे उत्तरदायित्व निर्धारीत करण्यात आले आहे. फारझर कंपनी मागणी करत असल्याप्रमाणे कोणाला जबाबदारी नाकारण्याचे संरक्षण देण्यात आलेले नाही. मात्र फायझरची मुख्य अट तीच आहे. अमेरिका आणि युरोपीय संघासह अन्य देशांनी आपल्याला तसे संरक्षण बहाल केले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
भारतात सध्या प्रचंड धुमाकुळ घालत असलेल्या बी.1.617 या व्हेरिएंटवर आपली लस प्रचंड प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा असून त्यांनी तसे सरकारला सांगितले आहे. 12 वर्षांच्या पुढच्या सगळ्याच व्यक्तींना ही लस उपयुक्त असून ती 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवता येउ शकते असेही कंपनीचे म्हणणे आहे. मात्र त्यांची संरक्षणाची अटच अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. ती मान्य झाली तर पाच कोटी डोस भारताला दिले जाउ शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.
केजरीवालांना फायझरच हवी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र दिल्लीतील मुलांच्या सुरक्षिततेचा दावा करत याच लसीचा आग्रह धरला आहे. इतकेच काय दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी फायझरशी लसींच्या खरेदीबाबत बोलणीही केली.
फायझरची अट माहित असूनही त्यांनी हा पुढाकार घेतला असून लवकरात लवकर या लसीला परवानगी दिली जाण्याची त्यांची मागणी आहे. दरम्यान, आम्ही राज्यांशी नाही तर थेट केंद्र सरकारशी बोलत असतो, ही आमची पॉलिसी असल्याचे कंपनीकडून केजरिवाल अँड कपनीला स्पष्ट करण्यात आले आहे.