मुंबई : कोरोना संकटकाळात राज्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानांतर्गत सहभागी बचतगटांतील महिलांनी मास्क, सॅनिटायझरची निर्मिती व विक्री यासह विविध उपक्रम राबवून सुमारे 60 कोटी 03 लाख रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोरोनामुळे आर्थिक संकट असताना राज्यातील या महिलांनी स्वत:च्या कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच लोकांसाठी मास्क, सॅनिटायझरसारख्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करुन दिली आहे.
34 जिल्ह्यातील 730 स्वयंसहायता समुहामधील 1 हजार 981 महिलांमार्फत नुकतेच 8.78 लाख मास्क बनविण्यात आले असून 7.76 लाख मास्कच्या विक्रीमधून 1 कोटी 19 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेत या बचतगटांनी सुमारे 1 कोटी 10 लाख मास्कची निर्मिती करुन त्यांच्या विक्रीतून सुमारे 13 कोटी 30 लाख रुपयांची उलाढाल केली होती.
कोरोना संकटकाळात आवश्यक असणाऱ्या सॅनिटायझरची निर्मिती आणि विक्रीही बचतगटांमार्फत करण्यात आली. राज्यातील 19 जिल्ह्यातील 40 स्वयंसहाय्यता समूहांमधील 199 महिलांमार्फत 8 हजार 059 लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली असून 5 हजार 049 लिटर सॅनिटायझरच्या विक्रीमधून 11 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
कोरोना संकटकाळात शहरी भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाजीपाला पुरवठा करण्याचे काम स्वयंसहाय्य्यता समुहांनी केले आहे. यामध्ये 34 जिल्ह्यातील 1 हजार 966 समुहातील 4 हजार 196 महिला सहभागी असून त्यांनी 8 हजार 649 क्विंटल भाजीपाला विक्रीतून 2 कोटी 71 लाख रुपयांची उलाढाल केली आहे. पहिल्या लाटेच्या काळातही महिला बचतगटांनी यामाध्यमातून 16 कोटी 75 लाख रुपयांची उलाढाल केली होती.
फळे खरेदी-विक्रीमध्ये 34 जिल्ह्यातील 1 हजार 225 समुहातील 3 हजार 205 महिला सहभागी असून त्यांनी 6 हजार 775 क्विंटल फळे विक्रीतून 3 कोटी 71 लाख रुपयांची उलाढाल केली आहे. पहिल्या लाटेच्या काळात या माध्यमातून 3 कोटी 06 लाख रुपयांची उलाढाल झाली होती.
राज्यातील 29 जिल्ह्यातील एकूण 796 स्वयंसहाय्यता समुहांनी 2 हजार 116 महिलांच्या माध्यमातून धान्य खरेदी व विक्री केली असून आजअखेर 41 हजार 344 क्विंटल धान्याची विक्री झालेली आहे, त्यामध्ये 9 कोटी 68 लाख रुपयांची उलाढाल झालेली आहे. पहिल्या लाटेच्या काळात या माध्यमातून 4 कोटी 22 लाख रुपयांची उलाढाल झाली होती.
कोविड केंद्रांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिलांनी जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये 16 जिल्ह्यातील 40 ठिकाणी जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 1 हजार 779 गावातील 517 महिला स्वयंसहाय्यता समूहातील 3 हजार 125 महिलांनी सामूहिक खरेदीचा अवलंब करून बी-बियाणे, खते आणि औषधांची एकत्रित खरेदी केली. यातून 4 कोटी 72 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. पहिल्या लाटेच्या काळात या माध्यमातून सुमारे 56 लाख रुपयांची उलाढाल झाली होती.
ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांनी बनविलेल्या मालाला ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत स्थापित समूहांची उत्पादने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातून 12.25 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
या सर्व महिलांचे मंत्री मुश्रीफ यांनी अभिनंदन केले असून समाजाला कोरोना संकटाच्या काळात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच झालेल्या व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक आधार देण्यात या महिलांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. महिलांना यापुढील काळातही बचतगटांच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.