मुंबई – जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरच्या पुढे आहेत. निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करतील म्हणून देशातील बऱ्याच ग्राहकांनी पेट्रोल-डिझेलची अतिरिक्त खरेदी केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत वाढ नोंदली गेली आहे.
आता लॉक डाऊनच्या अगोदर पेट्रोल आणि डिझेलची विक्री जेवढी होती तेवढी विक्री सध्या झाली असल्याचे दिसून येते. केवळ ग्राहकांनीच नाही तर वितरकांनीही किमती वाढतील म्हणून अगोदरच पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून ठेवली असल्याचे मार्च महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील आकडेवारीवरून दिसून येते.
1 ते 15 मार्च दरम्यान तेल कंपन्यांनी 1.23 दशलक्ष टन पेट्रोलची विक्री केली. ही विक्री गेल्या वर्षाच्या या कालावधीतील विक्री पेक्षा 18 टक्क्यांनी जास्त आहे. तर 2019 च्या या कालावधीतील विक्रीत पेक्षा 24 टक्क्यानी जास्त आहे.
1 ते 15 मार्च दरम्यान डिझेलची विक्री 23 टक्क्यांनी वाढून 3.53 दशलक्ष टन झाली आहे. 2019 मध्ये या कालावधीतील विक्री पेक्षा ही विक्री 17 टक्क्यांनी जास्त आहे. 132 दिवसापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पाच राज्यात झालेल्या निवडणुकामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत बदल झालेला नव्हता.
आता 15 मार्च नंतर या इंधनाच्या दरात वाढ होईल म्हणून ग्राहकांनी आणि वितरकांनी खरेदी केली असल्याचे दिसून येते असे विश्लेषकांनी सांगितले. कच्च्या तेलाच्या दराच्या तुलनेमध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर 12 रुपयाने कमी असल्याचे बोलले जाते.