नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत लिटरमागे अनुक्रमे 25 आणि 30 पैशांची वाढ केली. त्यामुळे देशभरात दोन्ही इंधनांचे दर उच्चांकी पातळीजवळ पोहचले.
सुमारे तीन आठवड्यांच्या विश्रामानंतर पुन्हा इंधन दरवाढीचे सत्र सुरू झाले आहे. सार्वजनिक कंपन्यांनी 24 सप्टेंबरपासून 7 दिवसांत डिझेलच्या दरात पाचवेळा वाढ केली. त्या वाढींमध्ये मिळून डिझेल 1 रूपया 25 पैशांनी महागले. त्यामुळे दिल्लीत जुलैमध्ये नोंदल्या गेलेल्या उच्चांकी डिझेल दराची (89.87 रूपये) बरोबरी झाली आहे.
मुंबईत डिझेल 97.52 रूपयांवर पोहचले आहे. पेट्रोलचा दर दिल्लीत 101.64 रूपये, तर मुंबईत 107.71 रूपये इतका आहे. पेट्रोल दराने जुलैमध्ये दिल्लीत (101.84 रूपये) आणि मुंबईत (107.83 रूपये) उच्चांकी पातळी गाठली होती.
काही दिवसांच्या खंडानंतर पेट्रोल दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्या वाढींमध्ये मिळून पेट्रोल 50 पैशांनी महागले. देशाच्या निम्म्याहून अधिक भागात पेट्रोल दर याआधीच 100 रूपयांवर गेला आहे. त्याशिवाय, तीन राज्यांत डिझेल दरानेही तो टप्पा ओलांडला आहे.