शिरूर (प्रतिनिधी) –शिरूर हुडको वसाहत येथील बांधकाम व्यावसायिक आदित्य संदीप चोपडा या बांधकाम व्यावसायिक यांच्या संशयास्पद मृत्युच्या निषेधार्थ शिरूर शहर आज व्यापाऱ्यांनी बंद ठेवून सायंकाळी कॅन्डल मार्च काढला. या खुनाची चौकशी व्हावी व आरोपींना त्वरित अटक करावी. जलदगती न्यायालयात ही केस चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी “जस्टीस फॉर आदित्य’ अशी मागणी शिरूर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आली आहे.
यावेळी शिरूरचे आमदार अशोक पवार, उद्योजक प्रकाश धारीवाल, संघपती भरत चोरडिया, सतीश धाडीवाल, बाजार समिती उपसभापती प्रवीण चोरडिया, नगरसेवक, नगरसेविका, हुडकोवासीय, महिला संघटना, व्यापारी वर्ग, सर्वपक्षीय कार्यकर्ते, लहान मुले व मुली, सामाजिक शैक्षणिक व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
“या खुनाचा तपास लावण्यासाठी नगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याशी व नगर ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याशी संपर्क साधला आहे. या खुनाबाबत विधानसभेमध्ये आवाज उठवून आदित्य चोपडा याला न्याय मिळावा अशी मागणी करणार आहे.
-अशोक पवार, आमदार शिरूर
याबाबतचे निवेदन शिरूर येथील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना शिरूर व पंचक्रोशी पारनेर श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी दिले आहे.
“आरोपींना त्वरित अटक करून कुटुंबाला न्याय मिळवून देणार आहे. अशा गुन्हेगार प्रवृत्तीच वेळीच ठेचल्या पाहिजे, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार.
-निलेश लंके, आमदार पारनेर
आदित्य संदीप चोपडा हा व्यवसायिक नारायणगव्हाण येथील नवले मळा येथे रस्त्याचे काम करत असताना त्याचे अपहरण करण्यात आल्याचे व त्यानंतर तीन दिवसांनी 29 सप्टेंबर रोजी तेथील विहिरीमध्ये आदित्य चोपडा याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर नागरिकांनी या भागात पुणे-नगर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले.
“पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व पोलीस खात्याने आदित्य चोपडा बेपत्ता झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची हालचाल केली नाही. त्यामुळे आदित्य चोपडा याचा निर्घृणपणे खून झाला. त्याच्या तोंडावर चेहऱ्यावर मारहाणीचे व्रण आहेत. याबाबत लवकरात लवकर आरोपींना अटक केली नाही तर संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल.
-सुवेंद्र गांधी, भाजप नेते अहमदनगर
आज शिरूर शहरातील सर्वपक्षीय, नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. सायंकाळी “जस्टीस फॉर आदित्य’ अशा घोषणा देत आरोपींना पकडून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी कॅण्डल मार्च काढण्यात आला. आज शिरूर येथील अमरधाम येथे आदित्य चोपडा यांचा अंत्यविधी झाला.