चेन्नई – “नीट’परीक्षा समर्थनाच्या भाजपच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी एका 38 वर्षीय व्यक्तीने भाजपच्या मुख्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकला. या हल्ल्याचा प्रदेश भाजपने तीव्र निषेध केला आहे आणि या प्रकरणाचा तपास “एनआयए’कडून करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार केवळ परीक्षांबाबतच्या भूमिकेला असलेला विरोध आहे, असे पोलिसांचे म्हणणे म्हणजे “फिल्मी डायलॉग’ असल्याचे भाजपने म्हटले आहे.
हा हल्ला करणाऱ्या देशविरोधी शक्तींना आणि मीूलतत्ववाद्यांना तातडीने अटक केली जायला पाहिजे, असे तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. सत्तारुढ द्रमुकने आत्मपरिक्षण करायला पाहिजे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळत चालली आहे. राज्यातील गुन्हेगारी आणि हिंसाचार वाढत असून त्यातूनच भाजपच्या मुख्यालयावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला.
9 फेब्रुवारीपासून भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. नागापट्टिणम येथे एका कार्यर्क्त्याची कार पेटवून देण्यात आली होती. चेन्नई, तिरुपूर आणि वेल्लोर येथील निवडणूक समन्वयाच्या कार्यालयांचीही तोडफोड करण्यात आली होती, अशी उदाहरणेही त्यांनी दिली.