मुंबई – दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथे असलेल्या भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे. ही आग रविवारी दुपारी 4.35 वाजताच्या सुमारास लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे भाजप प्रदेश कार्यालयाला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. भाजप कार्यालयात नुतनीकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी वेल्डिंगचे काम सुरू असताना कार्यालयाच्या किचनमध्ये आग लागली.
कार्यालयात कागदपत्रे आणि लाकडी फर्निचर असल्याने आगीने अधिकच पेट घेतला आणि त्यामुळे धुराचे लोटही पसरले. आग लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी हातातील काम टाकून तात्काळ बाहेर धाव घेतली. सर्व कर्मचारी एका क्षणात ऑफिसच्या बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली.