नवी दिल्ली- प्रदर्षित झाल्यापासून आदिपुरुष हा सिनेमा वादात सापडला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत चित्रपटातील अनेक दृश्ये, संवाद आणि पात्रे काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
विष्णू गुप्ता यांनी याचिकेत म्हटले आहे- चित्रपटात आमच्या आराध्य देवतांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे, जे आक्षेपार्ह आहे. त्यामुळे अशा चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली पाहिजे. अशी मागणी गुप्ता यांनी यावेळी केल्याचे समजते.
गुप्ता पुढे म्हणाले, ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटाचा महर्षी वाल्मिकी आणि संत तुलसीदास यांच्या रामायण आणि रामचरित मानसशी काहीही संबंध नाही. चित्रपटात ज्या प्रकारे तथ्यांशी छेडछाड करण्यात आली आहे ते पाहून आम्ही चिंतित आणि व्यथित झालो आहोत.
तसेच, आदिपुरुष चित्रपटात भगवान राम, माता सीता आणि हनुमानजी यांचे ज्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे ते महर्षि वाल्मिकी यांच्या रामायण आणि तुलसीदासांच्या रामचरितमानसच्या अगदी विरुद्ध असल्याचे याचिकेत म्हटले आहे. आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वसामान्यांकडून सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत अनेक नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.